लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले. सर्वच पक्षातील इच्छूक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरु केली. तिकीट मिळणे शक्य नाही हे लक्षात येताच आऊटगोईंगही सुरु झालं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आऊटगोईंगचा मोठा फटका बसला आहे. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील तसंच कागलचे समरजीत सिंह घाटगे यांनी उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच भाजपाला रामराम करत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. हे धक्के ताजे असतानाच नवी मुंबई भाजपामध्येही मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बडा नेता कुटुंबासह पक्ष सोडणार?
नवी मुंबईतील दिग्गज नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक हे त्यांच्या कुटुंबासह पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नाईक यांनी त्यांच्या नगरसेवक आणि समर्थक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते भाजपा सोडायचं की नाही यावर चर्चा करणार आहेत. नाईक सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन पक्षांची चाचपणी करत आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये ते यापूर्वी होते.
भाजपावर नाराजी का?
विधानसभा निवडणुकीत नाईक यांना त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांसाठी उमेदवारी हवी आहे. गणेश नाईक स्वत: ऐरोली तर त्यांचे पूत्र संदीप नाईक हे बेलापूर मतदारसंघासाठी इच्छूक आहेत. यापैकी ऐरोलीमध्ये गणेश नाईक आमदार आहेत. बेलापूरमध्ये सध्या भाजपाच्याच मंदा म्हात्रे आमदार आहेत. त्यांचं तिकीट कापून संदीप नाईक यांना भाजपाची उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील दोन जणांना विधानसभेची उमेदवारी देण्यासही भाजपामधील नेत्यांचा विरोध असल्याची माहिती आहे.
( नक्की वाचा : महाविकास आघाडी पक्षाला आणखी एक धक्का, 'हा' पक्ष साथ सोडण्याच्या तयारीत )
भाजपामधील अंतर्गत विरोध लक्षात घेऊन नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्यांचे पूत्र संजीव नाईक यांना भाजपानं उमेदवारी द्यावी अशी गणेश नाईक यांची इच्छा होती. पण, त्यांची ही मागणी मान्य झाली नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळाला. त्यावेळी नाईक यांची नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलं होतं.
शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरु केलेल्या गणेश नाईक यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना राष्ट्रवादीकडून मंत्रीपदही मिळालं. नाईक यांनी 2019 साली राष्ट्रवादीसोडून भाजपामध्ये प्रवेश केला. महायुतीच्या सरकारमध्येही ते मंत्रीपदासाठी इच्छूक होते. पण, त्यांना भाजपाकडून मंत्रीपद मिळालं नाही. नवी मुंबई महापालिकेत नाईक मानणारे अनेक नगरसेवक आहेत. नाईक यांनी भाजपा सोडल्यास पक्षाला या भागातील विधानसभा मतदारसंघात फटका बसू शकतो.