Gopal Shetty : मुंबई शहरातील भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बोरिवली मतदारसंघातच पक्षासमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भाजपानं यंदा बोरिवलीतून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या या निर्णयाला विरोध करत माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय. मुंबईतील ज्येष्ठ नेत्यानंच बंडखोरी केल्यानं भाजपासमोर पेच निर्माण झालाय. शेट्टी यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सध्या वरिष्ठ पातळीवरुन सुरु आहेत.
भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी शेट्टी यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते शेट्टी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर घेऊन गेले. शेट्टी यांनी उमेदवारी मागं घेण्याबाबतच तावडे शिष्टाई करत आहेत. फडणवीस यांच्या भेटीमध्ये काय झालं? याची माहिती तावडे यांनी ट्विट करुन दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'मी भाजपा कधीच सोडणार नाही. पक्षाचे नुकसान होईल असे काही करणार नाही, अशी ग्वाही गोपालजी शेट्टी यांनी देवेंद्रजी फडणवीस आणि शिवप्रकाशजी यांच्या भेटीनंतर दिली आहे.' असं ट्विट तावडे यांनी केलं आहे. त्यांनी यावेळी शेट्टी आणि भाजपा नेते यांचे एकत्र फोटो देखील शेअर केले आहेत. तावडे यांच्या ट्विटनंतर गोपाळ शेट्टी अर्ज मागे घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मी भाजपा कधीच सोडणार नाही. पक्षाचे नुकसान होईल असे काही करणार नाही, अशी ग्वाही गोपालजी शेट्टी यांनी देवेंद्रजी फडणवीस आणि शिवप्रकाशजी यांच्या भेटीनंतर दिली आहे.@Dev_Fadnavis @shivprakashbjp@iGopalShetty @ShelarAshish pic.twitter.com/8EwQZVM5od
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 2, 2024
अपक्ष म्हणून अर्ज का भरला?
गोपाळ शेट्टी हे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं त्यांचं तिकीट कापून त्या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर ते बोरिवली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. पण, पक्षानं यंदा बोरिवलीतून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. या निर्णयावर नाराजी व्यक्त करत शेट्टी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
ही सतत प्रयोगाची जागा नाही. या मतदारसंघातून विनोद तावडे, सुनील राणे, पियुष गोयल आणि आता संजय उपाध्याय अशा चार बाहेरच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही लढाई भाजपाविरोधात नाही, ही बोरीवलीकरांच्या स्वाभिमानाची लढाई आहे, असं सांगत शेट्टी यांनी अर्ज भरला होता.
( नक्की वाचा : मुंबईत 20 टक्के मुस्लीम पण तिकीट देण्यात कंजुसी का? बड्या नेत्याची नाराजी, MVA ला फटका बसणार? )
मी पक्षाच्या विरोधात नाही, पक्ष सोडला नाही. पक्षाने जरी काढले तरी मी पक्षाच्या विचारधारेवरच चालणार आहे. मला अनेक पक्षातून विचारणा झाली, अनेक पक्षाच्या नेत्याचे फोन आले मात्र मी कुठेही जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर नाराज शेट्टी यांनी मनधरणी करण्यासाठी भाजपानं तगडी फौज उतरवली आहे. या मध्यस्थीनंतर शेट्टी माघार घेणार का हे लवकरच स्पष्ट होईल. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर (सोमवार) आहे.