- भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 68 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली
- धारावी प्रभाग क्रमांक 185 मधून भाजपने रवी राजा यांना उमेदवारी दिली आहे.
- मुळ कार्यकर्त्यांनी बाहेरून आलेल्या उमेदवाराला विरोध दर्शविला आहे.
भाजपने मुंबई महापालिकेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत भाजपने 68 जणांच्या नावाची घोषणा केली आहेत. या यादीत काही उमेदवारांबाबत पक्षातील मुळ कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली आहे. त्या नाराजीचा उद्रेक होतानाही दिसला आहे. भाजपने वार्ड क्रमांक 185 मधून बाहेरून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुळ भाजपचे कार्यकर्ते भडकले आहेत. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी थेट वसंत स्मृती हे मुंबई भाजपचे कार्यालय गाठले. तिथेच त्यांनी घोषणाबाजी आणि ठिय्या आंदोलन केले.
भाजपने वार्ड क्रमांक 185 मधून रवी राजा यांना उमेदवारी दिली आहे. रवी राजा यांनी नुकताच काँग्रेसला सोडचिट्टी दिली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रवी राजा हे मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित होते. पण त्यांना कोणत्या वार्डमधून उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता होती. भाजपची पहिली यादी जाहीर झाली. त्यात रवी राजा यांचे नाव होते. त्यांना धारावीच्या प्रभाग क्रमांक 185 मधून उमेदवारी जाहीर झाली.
त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच स्थानिक आणि मुळचे भाजप कार्यकर्ते भडकले. त्यांनी दादरच्या वसंतस्मृती कार्यालयावर धडक दिली. तिथे त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाजपचा विजय असो असं ते म्हणत होते. पण त्याच वेळी बाहेरचा उमेदवार चालणार नाही असं ही सांगत होते. उमेदवार बदलण्याची मागणी ते करत होते. धारावीमध्ये धारावीचाच उमेदवार असावा अशी त्यांची मागणी होती. घोषणाबाजी केल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते भाजप कार्यालयाच्या बाहेरच ठिय्या देवून बसले.
आमच्या प्रभागात जो उमेदवार दिला आहे त्याला आम्ही ओळखत नाही. त्यामुळे आमच्या ओळखीचा उमेदवार आमच्या वार्डमध्ये द्यावा अशी मागणी केली जात होती. मात्र रवी राजा हे जेष्ट नगरसेवक आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये असताना अनेक वेळा नगरसेवक पद भूषवले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला महापालिकेत होणार आहे. त्यामुळे वरिष्ठांनी त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांना उमेदवारी जाहीर होताच असंतोषाचा सामना करावा लागला आहे.