- महापालिका निवडणुकीसाठी सर्व प्रमुख पक्षांनी नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्या आहेत.
- शिवसेनेत सहा, भाजपमध्ये चार, राष्ट्रवादीमध्ये तीन आणि काँग्रेसमध्ये दोन नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी
- राष्ट्रवादी अजित पवार गटातून नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्या आहेत. शिवसेनेतल्या नेत्यांच्या 6, भाजप 4, राष्ट्रवादी 3 तर काँग्रेस 2 नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्या आहेत. मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस, मनसे अशा सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. नगर पालिका निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक, पण मुंबई महापालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या पहिल्या यादीत घराणेशाहीचा बोलबाला दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत एकूण 28 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात 6 उमेदवार घराणेशाहीतून आल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिकडे काँग्रेसमध्ये आमदार अस्लम शेख यांच्या कुटुंबात दोघांना तिकीट देण्यात आलं आहे. तर भाजपात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ आणि वहिनीला उमेदवारी मिळाली आहे. कोणत्या पक्षात कोणत्या नेत्याच्या नातेवाईकाला उमेदवार देण्यात आलीय याची लिस्ट आपण पाहूयात.
मुंबई महापालिकेत घराणेशाहीचा बोलबाला
शिवसेना ठाकरे गट
- प्रभाग क्र. 54 - अंकित प्रभू, आमदार सुनील प्रमुख यांचा मुलगा
- प्रभाग क्र. 64 - सबा हारुन खान, आमदार हारुन खान यांची मुलगी
- प्रभाग क्र. 89 - गितेश राऊत, माजी खासदार विनायक राऊतांचा मुलगा
- प्रभाग क्र. 150 - सुप्रदा फातर्फेकर, माजी आमदार प्रकाश फातर्फेकर यांची मुलगी
- प्रभाग क्र. 225 - अजिंक्य धात्रक, माजी आमदार अशोक धात्रक यांचा मुलगा
- प्रभाग क्र. 95 - हरी शास्त्री, माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावई
राष्ट्रवादी अजित पवार गट
- प्रभाग क्र. 165 - कप्तान मलिक, नवाब मलिक यांचे बंधू
- प्रभाग क्र. 168 - डॉक्टर सईदा खान, नवाब मलिक यांची बहीण
- प्रभाग क्र. 170 - बुशरा नदीम मलिक, नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक यांची सून
काँग्रेस
- प्रभाग क्र. 33 - कमरजा सिद्दिकी, आमदार अस्लम शेख यांची बहीण
- प्रभाग क्र. 34 - हैदर अली शेख, आमदार अस्लम शेख यांचा मुलगा
भाजप
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकर यांना तिकीट देण्यात आलंय
- माजी आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित यांना उमेदवारी दिलीय
- तर माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांना पुन्हा तिकीट मिळालंय.
दरम्यान, कार्यकर्त्यांकडून आणि सोशल मीडियावरही घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा नेत्यांनी सारवासरव केली आहे. नगर पालिकांची निवडणूक ही कार्यकर्त्यांनी निवडणूक मानली जाते. लोकसभा आणि विधानसभेसाठी कार्यकर्ते आपल्या नेत्यांसाठी जीवाचं रान करतात. आधीच युती आणि आघाडीच्या समीकरणात मेहनत घेतलेले वॉर्ड दुसऱ्या पक्षाला गेल्यानं कार्यकर्त्यांच्या मनात अन्यायाची भावना आहे. मात्र, पालिका निवडणुकीतही नेत्यांचाच मुलगा, लेक, जावई, भाऊ, अशांना तिकीटं मिळणार असतील तर कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का? असा सवाल कार्यकर्ते एकमेकांनाच विचारताना दिसत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world