- मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती आणि ठाकरे बंधूंच्या गटांमध्ये मुख्य राजकीय संघर्ष होणार आहे
- महापालिकेतील आठ विभागांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची ताकद असून भाजप, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात स्पर्धा आहे
- ए विभागात भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात थेट मुकाबला अपेक्षित आहे
मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामात लागले आहेत. महायुती विरुद्ध ठाकरे बंधू विरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादी अशी लढत मुंबई महापालिकेत पाहायला मिळणार आहे. पण खरी लढत ही महायुती विरुद्ध दोन्ही ठाकरे बंधू यांच्यात रंगण्याची शक्यता आहे. गेलीय पंचवीस वर्षे शिवसेनेची मुंबई महापालिकेवर एक हाती सत्ता होती. आता शिवसेनेत फुट पडली आहे. त्यामुळे मुंबईचा बालेकिल्ला राखण्यासाठी ठाकरे बंधुंचा कस लागणार आहे. तर भाजपला मुंबईची सस्ता काही करून हवी आहे. तर काँग्रेसला आपण किंगमेकर होवू असं वाटत आहे. अशा या मुंबई महापालिकेत 24 प्रभाग आहेत. त्यातील एकूण 227 वार्डात मतदान होणार आहे. कोणत्या प्रभागात किती वार्ड आहेत. तिथे किती मतदार आहे. सध्या तिथे कुणाचे प्राबल्य आहे हे आपण पाहाणार आहोत.
ए विभाग
मुंबई महापालिकेच्या ए विभागात तीन वार्ड असणार आहेत. ए विभागात कुलाबा, फोर्ट, नेव्ही नगर , नरिम पाँईंट या भागांचा समावेश होतो. तीन वार्डात एकूण 87,104 पुरूष तर 68,429 महिला मतदार आहेत. या प्रभागात भाजपचं पारडं नेहमी प्रमाणे जड राहीलं आहे. असं असलं तरी ठाकरे शिवसेनेची ताकदही या वार्डमध्ये आहे. त्यामुळे इथं भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यात थेट सामना रंगणार आहे. मात्र काँग्रेसला मानणारा वर्ग ही या मतदार संघात आहे. इथं काँग्रेसचा आमदार ही निवडून आला होता. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारावरही इथलं राजकीय गणित ठरणार आहे.
बी विभाग
महापालिकेच्या बी विभागात डोंगरी, मोहम्मद अली रोड आणि भेंडीबाजर या भागाचा समावेश आहे. हा भाग काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा गड मानला जातो. शिवसेनेची काही ठिकाणी ताकद आहे. पण इथलं मतदार हा काँग्रेसचा पारंपारीक मतदार राहीला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे अमिन पटेल हे आमदार आहेत. त्यांची मतदार संघावर चांगली पकड आहे. त्यामुळे इथं सध्याच्या स्थितीत काँग्रेसची स्थिती मजबूत दिसते. तर काही भागात शिवसेना आणि भाजप हे ही तितक्याच ताकदीने उभे राहण्याची शक्यता आहे. या विभागात दोन वार्ड आहेत. या वार्डात 53 हजार पुरूष मतदार तर 46 हजार महिला मतदार आहेत. या दोन्ही वार्डवर काँग्रेसची मदार असणार आहे.
सी विभाग
भूलेश्वर, मुंबादेवी, नेताजी सुभाष मार्ग, लोहार चाळ यांचा यात समावेश होतो. इथं मुंबई महापालिकेचे तीन वार्ड आहेत. या ठिकाणी ही काँग्रेस आणि भाजपची चांगली ताकद आहे. भुलेश्वरमध्ये काँग्रेस तर मुंबादेवीत भाजपची ताकद आहे. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसची पारंपारीक वोट बँक आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत असेल. शिवसेनेला मानणारा मतदार काही प्रमाणात इथं आहे. त्यामुळे शिवसेना इथं कुणाची मतं खाणार यावर इथल्या निकालाचं गणीत असणार आहे. भाजप आणि काँग्रेससाठी या ठिकाणचं वातावरण अनुकूल समजलं जात आहे.
डी विभाग
गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा हा विभाग आहे. यात ग्रँट रोड, वाळकेश्वर, मलबार हिल, गिरगाव या विभागांचा समावेश होतो. एकीकडे उच्च वर्गीय तर दुसरीकडे मध्यमवर्गीय अशी विभागणी या विभागात झाली आहे. इथं शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे. ग्रँट रोड गिरगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे. तर वाळकेश्वर मलबार हिल परिसरात भाजपचा दबदबा आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा इथूनच निवडून येतात. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे इथून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची त्यांच्यावर जबाबदारी असेल. तर मराठी टक्का एकत्र करत जोरदार मुसंडी मारण्याची रणनिती ठाकरे बंधूंची असेल. या प्रभागात एकूण 6 वार्ड आहेत. त्यात 1 लाख 58 हजार पुरूष मतदार आहेत. तर 1 लाख 47 हजार महिला मतदार आहेत.
ई विभाग
भायखळा, मदनपुरा, आग्रीपाडा, नागपाडा, डॉकयार्ड रोड,रे रोड, चिंचपोकळी या भागांचा समावेश होता. या ठिकाणी सात वॉर्ड आहेत. अरूण गवळी यांची अखिल भारतीय सेना, एमआयएम, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट यांची ताकद या ठिकाणी आहे. तुलनेनं भाजपची ताकद या भागात कमी आहे. इथं खरी लढत ही शिवसेना ठाकरे विरुद्ध इतर अशीच असणार आहे. काही भागात काँग्रेसची ही ताकद आहे. मुस्लीम बहूल भागात एमआयएम ही आपली ताकद लावणार हे उघड आहे. तर भायखळ्यात दोन्ही शिवसेना एकमेकांच्या समोर असतील. इथं 1 लाख 70 हजार पुरूष मतदार आहेत. तर 1 लाख 50 हजार महिला मतदार आहेत. दोन्ही शिवसेनेसाठी हा विभाग महत्वाचा आहे. या ठिकाणी आतापर्यंत शिवसेनेचा दबदबा पाहायला मिळाला आहे.
एफ उत्तर विभाग
माटूंगा, सायन, वडाळा, हिंदू कॉलनी असा हा एफ उत्तर विभाग आहे. या विभागात एकूण दहा वार्ड आहेत. या ठिकाणी शिवसेना आणि मनसेचा दबदबा आहे. इथले खासदार हे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. शिवसेनेचा हा पारंपारीक गड समजला जातो. यावेळी शिवसेना ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार आहेत. त्यामुळे इथल्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर दोन्ही ठाकरे बंधूंचा भर असणार आहे. तर वडाळा, सायन या भागात भाजपची ताकद आहे. इथले काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी ही भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे इथं भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे या विभागात भाजप विरूद्ध शिवसेना ठाकरे बंधू अशा थेट सामना रंगणार आहे.
एफ दक्षिण विभाग
या विभागात एकूण 7 वार्ड आहेत. परळ, लालबाग आणि हिंदमाताचा समावेश होतो. हा विभाग म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. मनसेची ही ताकद या ठिकाणी मोठी आहे. त्यामुळे इथं भाजप जोर लावण्याची शक्यता आहे. शिवसेना फुटीनंतर ठाकरे गट या ठिकाणी आपली जास्त ताकद लावणार आहे. सध्या इथले आमदार हे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. त्यामुळे इथला मराठी माणून जर दोन्ही ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहीला तर विरोधकांचे खाते उघडण्यास ही इथं अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. जवळपास 1 लाख 70 हजार पुरूष मतदार या ठिकाणी आहेत. तर 1 लाख 54 हजार महिला मतदार आहेत.
जी उत्तर विभाग
या विभागात एकूण 11 वार्ड आहेत. यात धारावी, कोळीवाडा, माहिम, दादर, शिवाजी पार्क याचा समावेश होतो. शिवसेना ठाकरे गटाचा हा खऱ्या अर्थाने बालेकिल्ला आहे. शिवाय मनसेची ताकद ही या ठिकाणी मोठी आहे. दोन्ही ठाकरे आता इथं एकत्र लढत आहेत. त्याचा त्यांन थेट फायदा होण्याची दाट शक्यता आहे. तर धारावीमध्ये काँग्रेसची ताकद आजही आहे. इथं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि त्यांच्या आमदार बहीणीवर काँग्रेसची मदार असणार आहे. तर या ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आपल्या पदरात काही पडेल का याचा प्रयत्न करतील.या मतदार संघात 2 लाख 47 हजार पुरूष मतदार आहेत. तर 2 लाख 18 हजार महिला मतदार आहेत.
जी दक्षिण विभाग
वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, लोअर परेल, करी रोड या मराठी बहुल भागाचा या विभागात समावेश होतो. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे या मतदार संघातून निवडून येतात. त्यामुळे सर्वांचे लक्ष या विभागाकडे असणार आहे. इथं एकूण सात वॉर्ड आहेत. इथं शिवसेना ठाकरे गटाचे दिग्गज माजी नगरसेवक, माजी महापौर निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. तर ठाकरेंचा हा गड भेदण्याचे शिवधनुष्य शिवसेना शिंदे आणि भाजपला पेलावे लागणार आहे. विधानसभेला या मतदार संघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीत इथं चुरस पाहायला मिळणार आहे. मनसेची ही काही प्रमाणात ताकद या मतदार संघात आहे. त्याचा फायदा ठाकरे गटाला होवू शकतो. 1 लाख 91 हजार पुरूष मतदार इथं आहेत. तर 1 लाख 59 हजार महिला मतदार या ठिकाणी आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world