
पुणे: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असून, पुणे महानगरपालिका (PMC) आणि जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिकेवर पुन्हा एकहाती सत्ता मिळवण्याच्या निर्धाराने भाजपने 'मिशन सव्वाशे' (Mission 125) लक्ष ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभागरचनेमुळे (Ward Restructuring) स्थानिक राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे.
भाजपच्या सोयीची 'अंतिम रचना':
अंतिम प्रभागरचनेत सत्ताधारी भाजपचा वरचष्मा स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रारूप आराखडा असो वा अंतिम आराखडा, दोन्ही रचना भाजपच्या सोयीच्या ठरल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांनी केलेल्या हरकतींवर प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचे विरोधी नेत्यांचे म्हणणे आहे. याकडे प्रशासनाने फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 चे उद्घाटन आणि बरंच काही; पंतप्रधानांचा 2 दिवस भरगच्च कार्यक्रम
अजित पवारांची नाराजी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच प्रभागरचनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. "प्रभागरचना पक्षनिहाय न होता ती लोकसंख्येच्या आणि भौगोलिक परिस्थितीच्या आधारे व्हावी," अशी त्यांची मागणी होती. मात्र, अंतिम आराखड्यात पवारांची ही भूमिका पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे आणि सुभाष जगताप यांच्या सूचनांकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला आणि कोथरूड यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांतील बदल भाजपसाठी अनुकूल ठरले आहेत. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ९७ नगरसेवक मिळवले होते, जो आकडा आता १०३ पर्यंत पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने १६५ सदस्य असलेल्या पुणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी थेट 'मिशन सव्वाशे' वर लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान, भाजपच्या या 'एकला चलो रे' भूमिकेमुळे महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातही अस्वस्थता वाढली आहे. प्रभागरचना भाजपच्या पथ्यावर पडल्याने आगामी निवडणुकीत पुणे महापालिकेतील राजकीय समीकरणे नव्याने बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world