BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मुंबईतील दोन महत्त्वाच्या वॉर्डमधून महायुती आऊट झाली आहे. वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. तांत्रिक चुका आणि वेळेचे नियोजन न जमल्याने महायुतीला या दोन जागांवर पाणी सोडावे लागले असून, याचा थेट फायदा इतर पक्षांना मिळणार आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 मध्ये भाजपने शकील अन्सारी यांना उमेदवारी जाहीर केली होती. हा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी असल्याने भाजपने येथे विशेष रणनीती आखली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता शकील अन्सारी यांना करता आली नाही.
निवडणूक आयोगाच्या छाननीमध्ये कागदपत्रे अपूर्ण असल्याचे आढळल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. यामुळे या वॉर्डमध्ये आता कमळ किंवा धनुष्यबाण यापैकी कोणतेही चिन्ह मतदारांना पाहायला मिळणार नाही.
( नक्की वाचा : BMC Election 2026 MNS Candidate List: मनसेचे 'मिशन मुंबई'; 53 जणांना उमेदवारी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी? )
दुसरीकडे वॉर्ड क्रमांक 212 मध्ये तर अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. येथे भाजपने मंदाकिनी खामकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांना पक्षाचा एबी फॉर्मही मिळाला होता, मात्र अर्ज दाखल करण्यासाठी त्या निवडणूक कार्यालयात केवळ 15 मिनिटे उशिराने पोहोचल्या.
निवडणूक आयोगाच्या कडक नियमांमुळे वेळ संपल्यानंतर आलेला हा अर्ज स्वीकारण्यास नकार देण्यात आला आणि परिणामी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला. उमेदवाराकडून झालेल्या या दिरंगाईमुळे महायुतीला या वॉर्डमधून माघार घ्यावी लागली आहे.
( नक्की वाचा : Thane Municipal Election ठाण्यात शिवसेना-भाजप युती, मनसेच्या 28 उमेदवारांची घोषणा; पाहा तुमच्या प्रभागात कोण? )
मतदानाआधीच महायुती बॅकफूटवर
मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीत प्रत्येक वॉर्ड महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अशा परिस्थितीत दोन वॉर्डमध्ये उमेदवारच नसणे ही महायुतीसाठी नामुष्की मानली जात आहे. एबी फॉर्म मिळूनही केवळ वेळेचे नियोजन न जमल्याने आणि कागदपत्रांच्या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केल्याने भाजपला या जागा गमवाव्या लागल्या आहेत. आता या दोन प्रभागांमधील महायुतीचे मतदार कोणाला कौल देतात आणि याचा फायदा कोणाला होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.