Maharashta Election 2026 : मुंबई महानगरपालिकेचे निकाल आता समोर येत असून मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुसंडी मारली आहे. महायुती बहुमताच्या दिशेनं वेगाने वाटचाल करत आहेत. दुसरीकडे, या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मात्र मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करूनही राज ठाकरे यांना मुंबईत आपली जादू दाखवता आलेली नाही.
मुंबई महापालिकेत भाजपाची मोठी झेप
मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी झालेल्या या लढतीत भाजपने 88 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेना 28 जागांवर आघाडीवर भाजप आणि शिवसेनेने एकत्रितपणे जोरदार कामगिरी केल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच्या चुरशीच्या लढाईनंतर आता भाजप आणि शिवसेवा सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत. मुंबईतील मतदारांनी युतीच्या बाजूने कौल दिल्याचे सुरुवातीच्या कलानुसार स्पष्ट होत आहे.
( नक्की वाचा : BMC Election 2026 Result : मुंबईतील उद्धव ठाकरेंच्या पराभवाचे राज ठरले व्हिलन! 25 वर्षांचा गड अखेर कोसळला )
राज ठाकरे यांच्या मनसेची वाताहत
मराठी माणसाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेचे या निवडणुकीत अक्षरशः पानिपत झाले आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मनसेला मतदारांनी नाकारल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेत मनसेला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागत आहे. चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करूनही राज ठाकरे यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. केवळ मुंबईतच नव्हे, तर नाशिक आणि पुण्यासारख्या त्यांच्या बालेकिल्ल्यातही मनसेची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे.
प्रमुख शहरांमधील मनसेची पीछेहाट
राज ठाकरे यांच्या पक्षाला अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये खातेही उघडता आलेले नाही. पुण्यात 165 जागांपैकी 122 जागांचे कल हाती आले असून तिथे मनसेला एकही जागा मिळालेली नाही.
(नक्की वाचा : PMC Election Result : पुण्यात भाजपाच्या वादळात पवार परिवार उडाला! मोठ्या विजयाकडं BJP ची वाटचाल, पाहा अपडेट )
ठाणे, नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्ये मनसेला प्रत्येकी केवळ 1 जागा मिळाली आहे. नाशिकमध्ये 2 तर अहिल्यानगरमध्ये 3 उमेदवार आघाडीवर आहेत. कल्याण डोंबिवलीत 122 जागांपैकी मनसेला केवळ 4 जागांवर आघाडी मिळवता आली आहे. याशिवाय नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूरसह एकूण 22 शहरांमध्ये मनसेचा पूर्णपणे सफाया झाला आहे.
कोणत्या शहरात मनसेचा सफाया?
ज्या 22 शहरातील महानगपालिका निवडणुकीत मनसेला खातं उघडता आलेलं नाही, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, मालेगाव, जळगाव, धुळे, इचलकरंजी, नांदेड, लातूर, परभणी, जालना, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे.