जाहिरात
Story ProgressBack

चंद्रपुरात जातीय समीकरणाचा भाजपला फटका? सहानुभूती विरूद्ध व्यूहरचना, नेमका कल काय?

विविध जातीधर्माचे तर कधी अल्पसंख्याक खासदार लाभलेल्या चंद्रपूरात जातीय समीकरणांवर मतदान होत नाही असं म्हटलं जात असताना यंदा मात्र यात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Read Time: 4 mins
चंद्रपुरात जातीय समीकरणाचा भाजपला फटका? सहानुभूती विरूद्ध व्यूहरचना, नेमका कल काय?
चंद्रपूर:

देशातील सर्वात मोठी पेपर मिल इंडस्ट्री (बल्लाळपूर) असलेल्या चंद्रपूरात स्थानिक किंवा विकासाच्या मुद्द्याऐवजी राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांवरुन मतदान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध जातीधर्माचे तर कधी अल्पसंख्याक खासदार लाभलेल्या चंद्रपूरात जातीय समीकरणांवर मतदान होत नाही असं म्हटलं जात असताना यंदा मात्र यात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

लोकसभा 2024 मध्ये चंद्रपूर मतदारसंघातून राज्याचे वनमंत्री-सांस्कृतिक मंत्री, सहा वेळा आमदार, तीन वेळा मंत्री राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होत आहे. सुरुवातीला भाजप आणि काँग्रेस दोन्हीकडे उमेदवारीवरुन वाद सुरू होता. मागील चार टर्म सलग खासदार राहिलेले हंसराज अहीर यांना तिकीट नाकारत सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी मुनगंटीवारही मतदान लढवण्यास उत्सुक नसल्याचं सांगितलं जात होतं. तर दुसरीकडे काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार या जागेसाठी आग्रही होते. याशिवाय त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना तिकीट मिळवून देण्यासाठीही वडेट्टीवार प्रयत्नशील होते. मात्र काही महत्त्वाच्या फॅक्टरचा विचार करून काँग्रेसने प्रतिक्षा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली. 

Latest and Breaking News on NDTV

जातीय समीकरणं की विकासाचा मुद्दा?
या मतदारसंघातील काही राजकीय तज्ज्ञांनुसार, यंदाची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. लोकसभा निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय पातळीवरील मुद्दा उदाहरणार्थ रोजगार, महागाई, भ्रष्टाचार हे मुद्दे प्रभावी ठरल्याचं दिसून येत आहे. चंद्रपूरात कुणबी, तेली हा समाज प्रभावी ठरणारा आहे. सुधीर मुनगंटीवार कोमटी समाजातील तर धानोरकर या कुणबी समाजातील आहेत. त्यामुळे जर यंदा जातीय समीकरणांच्या आधारावर मतदान झालं तर प्रतिभा धानोरकरांना याचा फायदा मिळू शकतो. 

Latest and Breaking News on NDTV

प्रतिभा धानोरकरांसाठी प्रभावी ठरणारे मुद्दे..
दिवंगत बाळू धानोरकर 2019 च्या लोकसभेत काँग्रेसमधून निवडून आलेले एकमेव खासदार. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आलं आणि त्यांनी स्वत:ला सिद्धही केलं. 30 मे 2023 रोजी त्यांचं अकाली निधन झालं. त्यानंतर येथे पोटनिवडणूक झाली नाही. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्यात नव्याने राजकीय समीकरणाची मांडणी केली जाऊ लागली. पुढे या जागेवरून बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर इच्छुक असल्याचं समोर आलं.

ही निवडणूक प्रतिभा धानोरकरांच्या बाजूने जाऊ शकते यामागील पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे प्रतिभा यांच्यामागे असलेली सहानुभूती. या सहानुभूतीतून त्यांना मतदान केलं जाऊ शकतं. दुसरी बाब म्हणजे जनतेमध्ये महिला म्हणून असलेला विश्वास. चंद्रपूर मतदारसंघात कुणबींची संख्या जास्त आहे. त्यात धानोरकर या धनोजे कुणबी समाजाच्या असल्याने त्यांना मतदान केलं जाऊ शकतं. मात्र यंदा जर जातीय समीकरणांवरुन मतदान झालं तर सुधीर मुनगंटीवारांसाठी ही निवडणूक जड जाऊ शकते. 

Latest and Breaking News on NDTV

मतदानाचा टक्का वाढला, मात्र फायदा कुणाला?
2019 लोकसभा निवडणुकीत 65 टक्के मतदान झालं होतं. तर यंदा हीच संख्या 67.55 % पर्यंत पोहोचली. त्यामुळे वाढलेली अडीच टक्के मतं कोणाच्या पारड्यात पडणार हा प्रश्न आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत सुरेश धानोरकर 5 लाख 59 हजार 507 मतांनी विजयी झाले होते. यावेळी भाजपचे हंसराज अहिर यांना 5 लाख 14 हजार 744 मतं मिळाली होती. यावेळी 44 हजार 763 मताधिक्याने बाळू धानोरकर विजयी झाले होते. त्यापूर्वी 2014 मध्ये हंसराज अहिर यांना 5 लाख 8 हजार 49 मतं मिळाली होती. यावेळी सुरेश धानोरकर यांना 2 लाख 71 हजार 780 मतं मिळाली होती. म्हणजे अवघ्या पाच वर्षात मतांचा आकडा 2 लाख 87 हजार 727 मतांनी वाढला होता. त्यामुळे 2019 पासूनच काहीप्रमाणात जातीय समीकरणांवर आधारित मतदान झाल्याचा दावा केला जात आहे. याचवेळी 2014 मध्ये भाजपला 45.77 टक्के, तर 2019 मध्ये भाजपला 41.56 टक्के मतदान झालं होतं. दुसरीकडे 2014 मध्ये काँग्रेसला 24.49 टक्के आणि 2019 मध्ये काँग्रेसला 45.18 टक्के मतदान झालं होतं. 2014 मध्ये मोदी लाटेमुळे या विधानसभेत चंद्रपूरात भाजपचे सर्वाधिक आमदार होते, त्यानंतर मात्र 2019 मध्ये हा आकडा घसरताना दिसतो. 

Latest and Breaking News on NDTV

यंदा थेट लढत...
यंदाची लढत ही काँग्रेस विरूद्ध भाजप अशी थेट पाहायला मिळत आहे. प्रतिभा धानोरकरांकडे सहानुभूतीचा फॅक्टर असला तरी सुधीर मुनगंटीवारानाही या निवडणुकीत जमेची बाजू होती. सहा वेळा आमदार राहिलेल्या मुनगंटीवारांकडे निवडणुका लढवण्याचा आणि व्युहरचना आखण्याचा चांगला अनुभव आहे. त्याशिवाय येथून पालकमंत्री असल्याकारणाने या भागातील कामं हीदेखील जमेची बाजू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात सभा घेऊन मुनगंटीवारांचा प्रचार केला. मात्र प्रतीभा धानोरकरांच्या बाबतीत पक्षांतर्गत वाद पाहायला मिळाला. विजय वडेट्टीवारांनी इथं झोकून देऊन काम करणं अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात त्यांनी इथं दोनच सभा घेतल्या. त्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील कोणताही नेता त्यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात आला नाही. त्यामुळे धानोरकरांचा संपूर्ण प्रचार दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी केला. त्यामुळे एकत्रित पाहिलं तर मुनगंटीवारांचं व्यापक कॅम्पेनिंग झालं होतं. 

चंद्रपूर लोकसभेतील विधानसभा

विधानसभाआमदारपक्ष
राजुरासुभाष रामचंद्रराव धोटेकाँग्रेस
चंद्रपूरकिशोर गजानन जोरगेवारअपक्ष
बल्लालपूरसुधीर सच्चिदानंद मुनगंटीवारभाजप
वरोरा प्रतिभा सुरेश धानोरकरकाँग्रेस
वणी संजिवरेड्डी बापुराव बोदकुरवारभाजप
आर्णीसंदिप प्रभाकर धुर्वेभाजप

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Exit Poll म्हणजे काय? तो कसा करतात? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
चंद्रपुरात जातीय समीकरणाचा भाजपला फटका? सहानुभूती विरूद्ध व्यूहरचना, नेमका कल काय?
exit-poll-predictions-vs-final-results-a-look-at-2014-and-2019-lok-sabha-elections-here
Next Article
Exit Polls : गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचा काय होता अंदाज ? किती ठरले खरे?
;