संभाजीनगरमध्ये पुन्हा खान की बाण? खैरेंच्या नाराजीनंतरही ठाकरेंनी दिली 'मामूं' ना उमेदवारी, वाद पेटणार?

Chhatrapati Sambhajinagar Election 2026:  छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
छत्रपती संभाजीनगर:

सागर जोशी, प्रतिनिधी 

Chhatrapati Sambhajinagar Election 2026:  छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा तीव्र विरोध झुगारून माजी महापौर रशीद मामू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या एका निर्णयामुळे जिल्ह्यात अंबादास दानवे यांची पकड मजबूत झाल्याचे दिसत असून, खैरेंचे पक्षातील वजन कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेनेतील अंतर्गत सत्तासंघर्ष

संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने रशीद मामू यांना तिकीट दिल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांचा शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश घडवून आणला होता. सुरुवातीपासूनच चंद्रकांत खैरे यांनी या प्रवेशाला आणि मामूंच्या उमेदवारीला जाहीर विरोध केला होता. मी तुला उमेदवारी मिळू देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत खैरेंनी मामूंना फटकारले होते, मात्र अखेर दानवे आपली रणनीती यशस्वी करण्यात यशस्वी ठरले आहेत.

( नक्की वाचा : BMC Election 2026 : मुंबईच्या सत्तेसाठी भाजपाची 'फिल्डिंग'; 137 उमेदवार रिंगणात, वाचा तुमचा उमेदवार कोण? )
 

रशीद मामूंवर गंभीर आरोप

रशीद मामू यांना उमेदवारी मिळाल्याने जुन्या वादांना पुन्हा तोंड फुटले आहे. समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चावेळी रशीद मामू यांनी दगडफेक घडवून आणली होती, असा आरोप त्यांच्यावर आहे. दंगल पसरवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा असल्याने त्यांना पक्षात घेणे चुकीचे असल्याचे मत खैरे यांनी वारंवार मांडले होते. आता त्यांना थेट उमेदवारी मिळाल्याने खैरेंनी 'मी काय करतो ते पाहा' असा इशाराच दिला आहे, ज्यामुळे येत्या काळात पक्षात मोठी बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून आणि उमेदवारीवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपा आमदार अमित साटम यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणारा नेता ठाकरेंच्या पक्षात गेल्याची टीका केली आहे. 

Advertisement

तर दुसरीकडे प्रकाश महाजन यांनी हिंदूंचे वारसदार समजणारे रशीद मामूंचे भाचे निघाले, अशा खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. सत्ताधाऱ्यांकडून आता ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख 'मामू सेना' असा केला जात आहे.

(नक्की वाचा : Nashik-Solapur : नाशिक ते सोलापूर आता 'बुलेट' वेगाने; मोदी सरकारचा महाप्रकल्प, वाचा सर्व माहिती ! )
 

निवडणुकीचे समीकरण बदलणार

संभाजीनगरमध्ये नेहमीच 'खान की बाण' असा सामना पाहायला मिळतो, परंतु यावेळी रशीद मामू यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीचे केंद्रबिंदू बदलण्याची चिन्हे आहेत. एकीकडे ठाकरे गटात दानवे विरुद्ध खैरे असा सामना रंगला असताना, दुसरीकडे महायुतीने या मुद्द्यावरून ठाकरेंना घेरण्याची तयारी केली आहे. या वादाचा फटका आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला बसणार की अंबादास दानवे आपली ताकद सिद्ध करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement