Lok Sabha Elections 2024 Phase 2 Voting: देशभरात शुक्रवारी (26 एप्रिल) दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं. या मतदानाच्या दरम्यान काही ठिकाणी अनुचित प्रकार घडले. नांदेडमध्ये मतदारानं कुऱ्हाडीनं EVM फोडल्याची घटना घडली. तर छत्तीसगडमध्ये भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. राजनांदगाव लोकसभा मतदारसंघातील (Rajnandgaon Loksabha Seat) मतदानाच्या दरम्यान हा प्रकार घडला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री भुपेश बघल यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाचे माजी खासदार अभिषेक सिंह यांनी या विषयावर काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.
काय आहे प्रकरण?
राजनांदगाव हा लोकसभेचा हायप्रोफाईल मतदारसंघ आहे. इथं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि भाजपाच्या संतोष पांडे यांची लढत होतीय. शुक्रवारी सकाळपासून इथं मतदानासाठी उत्साह दिसला. राजनांदगावमधील टेडेसर मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. माजी मुख्यमंत्री मतदान केंद्रावर पोहोचले होते त्यावेळी भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा वाद इतका वाढला की दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. हा प्रकार घडताच पोलीसांची मोठी तुकडी घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतरही हा वाद थांबला नाही.
भाजपा कार्यकर्त्यांनी मला मतदान केंद्रात जाण्यापासून रोखलं तसंच धक्काबुक्की केली, असा आरोप बघेल यांनी केला. त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं, त्यामुळे हा संपूर्ण वाद झाला. या प्रकरणात निवडणूक आयोगाकडं तक्रार केलीय. पण, अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : मतदाराने कुऱ्हाडीने फोडलं EVM, नांदेडमधील मतदान केंद्रात प्रचंड गोंधळ )
या संपूर्ण घटनाक्रमामध्ये भाजपाचे माजी खासदार अभिषेक सिंह देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. भूपेश बघेल यांच्यासोबत दूर्गहून आलेल्या व्यक्तींनी भाजपा कार्यकर्ते आणि महिलांसोबत मारहाण केली, असा आरोप सिंह यांनी केलाय. या प्रकरणामुळे छत्तीसगडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.