हातकणंगले मतदारसंघात राडा, मविआ-महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जोरदार हाणामारी

Advertisement
Read Time: 2 mins
हातकणंगले:

आज 7 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. आज महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील उमेदवारांचं भविष्य ठरणार आहे.  आज रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात मतदान होत आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत हातकणंगले मतदारसंघात 7.55 टक्के तर सकाळी 11 वाजेपर्यंत 20.74 टक्के मतदान झालं. दरम्यान हातकणंगले मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  

वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमाक 62,63 वर हा प्रकार घडला. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या दोन् गटात जोरदार हाणामारी झाली. मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. धैर्यशील माने यांच्या गटाने मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले होते. यावरून सत्यजित पाटील सरूडकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. जाब विचारण्या करीता आले असता दोन्ही गटात शाब्दिक वादावादी होऊन जोरदार हाणामारी झाली.  

नक्की वाचा - देशभरात तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान; राज्यात दिग्गजांचं भवितव्य पणाला

पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांचा हस्तक्षेप झाल्यानंतर आता सध्या मतदान सुरळीत सुरू असल्याची माहिती आहे. धर्यशील माने गटाचे दत्तात्रेय पाटील यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांच्या बोगस प्रतिनिधीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.