सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी आता आरोपांच्या फैरी झाल्या आहेत. त्यात उमरखेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय काँग्रेसविरोधात बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ऐन निवडणूक काळात एकच खळबळ उडाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2009 साली काँग्रेसच्या तिकिटावर उमरखेड मतदारसंघातून विजय खडसे हे विजयी झाले होते. या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यांनी दावा केला की पक्षाच्या सर्वेक्षणात ते सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार ठरले होते. तरी देखील पक्षाने त्यांना डावलून बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली असा आरोप त्यांनी केला आहे. ज्यावर त्यांनी नाराजी ही व्यक्त केली आहे. काँग्रेसमधील कार्यकर्त्यांच्या भावना नाकारल्या जात आहेत. पक्षाचे नेतृत्व निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - महाविकास आघाडीत कुठे कुठे मैत्रीपूर्ण लढती, माघार कोण घेणार?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर देशभरात काँग्रेसला बळ मिळाले होते. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी निवड समितीला विशिष्ट निकष पाळण्याचे निर्देश दिले होते. विशेषतः भ्रष्टाचारी व्यक्तींना तिकीट देऊ नये, असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला होता. मात्र, नाना पटोले यांनी या निकषांकडे दुर्लक्ष करून पक्षाच्या तिकीटाची विक्री केल्याचा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे. पटोले यांनी स्वार्थासाठी तिकीट विक्री केल्याचे ही ते म्हणाले.
खडसे यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यानेच असा थेट आरोप केलेल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते. दरम्यान याबाबत नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी याबाबत वक्तव्य करण्याचे टाळले आहे. आधी जागा वाटपाचा घोळ त्यानंतर तिकीट वाटपा वरून नाराजी मुळे काँग्रेस पुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सर्व गोंधळात विजय खडसे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उमरखेड मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उमरखेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र इथं झालेल्या बंडखोरीमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढू शकतात.