जाहिरात

महाविकास आघाडीत कुठे कुठे मैत्रीपूर्ण लढती, माघार कोण घेणार?

महाविकास आघाडीत ही अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. मविआतल्या घटक पक्षांनी एकाच मतदार संघात दोन उमेदवार दिले आहेत.

महाविकास आघाडीत कुठे कुठे मैत्रीपूर्ण लढती, माघार कोण घेणार?
मुंबई:

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसह अनेक बंडखोरांनीही उमेदवारी दाखल केली आहे. त्यात महाविकास आघाडीत ही अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. मविआतल्या घटक पक्षांनी एकाच मतदार संघात दोन उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या मतदार संघात मैत्रीपूर्ण लढती होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास पाच मतदार संघात मविआतल्या घटक पक्षांनी परस्पर विरोधात उमेदवार दिले आहेत. याबाबत आता कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मविआतील नेते हा उमेवारांची समजूत काढणार की बंडखोरी कायम ठेवायला लावणार हे ही स्पष्ट होणार आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी परस्पर विरोधी उमेदवार देण्यात आले आहे. त्यात पंढरपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसने भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर त्याच वेळी या मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने अनिल सावंत यांना उमेदवारी घोषीत केली आहे. त्यामुळे या जागेवरून पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या दोघांमध्ये कोण उमेदवारी मागे घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पंढरपूर प्रमाणे सांगोल्यातही आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. इथे शिवसेना ठाकरे गटाने दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर 
शेकापने बाबासाहेब देशमुख यांना मैदानात उतरवलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  कोणत्या पक्षाने कुठे गडबड केली उद्या समजेल, जागावाटपातील घोळाबाबत नाना पटोलेंचं वक्तव्य

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातही मविआत बंडखोरी झाली आहे. काँग्रेसने इथे दिलीप माने यांना मैदानात उतरवलं आहे. त्याच वेळी शिवसेना ठाकरे गटाने अमर पाटील यांनी अधिकृत उमेदवारी दिली आहे. पाटील यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे मविआतील दोन पक्ष या ठिकाणीही एकमेकां विरोधात ठाकले आहेत. हीच स्थिती परांडा विधानसभा मतदार संघात आहे. इथे शिवसेना ठाकरे गटाने रणजीत पाटील यांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने राहुल मोटे यांना आपला अधिकृत उमेदवार केला आहे. 

(नक्की वाचा - राष्ट्रवादी पक्षफुटीवर शरद पवार पहिल्यांदा एवढं बोलले, बारामतीत मोठं भाष्य)

सर्वात जास्त चर्चा ज्या जागेची झाली ती म्हणजे विदर्भातील दिग्रस विधानसभा मतदार संघाची. हा मतदार संघ काँग्रेसला मिळावा यासाठी शेवटपर्यंत काँग्रेसने प्रयत्न केले होते. या ठिकाणी काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र ही जागा शिवसेना ठाकरे गट सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी पवन जैस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याच वेळी काँग्रेसनेही माणिकराव ठाकरे यांना आपला अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे. 

(नक्की वाचा-  आर आर पाटलांनी केसाने गळा कापला; अजित पवार असं का म्हणाले?)

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आता सर्वांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. यातले किती जण उमेदवारी मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर कोणीच उमेदवारी मागे घेतली नाही तर या मतदार संघात मैत्रीपूर्ण लढती होतील अशी स्थिती आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत सुरू होता. त्यामुळे अजूनही कोणाला कोणती जागा आणि किती जागा यात स्पष्टता आलेली नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com