देशात लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) यांनी निवडणुकीत प्रभावी राहणाऱ्या मुद्द्यावरुन एक सर्वेक्षण केलं आहे. देशातील आगामी निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावरुन मतदार मत देऊ शकतो, यावर आधारित CSDS-लोकनीतीने हे सर्वेक्षण केलं आहे. CSDS च्या या सर्वेक्षणात धक्का देणारे आकडे समोर आले आहेत. सर्वेक्षणातील आकड्यांनुसार, देशात महागाई, बेरोजगारी हे दोन मुद्दे सर्वात प्रभावी ठरले आहेत. यासोबतच अयोध्येतील तयार होणाऱ्या राम मंदिराच्या मुद्द्यावरुन मत देण्यासंदर्भात जनतेत फारसा उत्साह दिसत नाही.
जाणून घेऊया सर्वेक्षणातील महत्त्वपूर्ण बाबी...
प्रत्येक पाच पैकी तिघांचं म्हणणं आहे की, आधीच्या तुलनेत आता नोकरी मिळणं कठीण झालं आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सद्यपरिस्थितीत नोकरी मिळवणं किती अवघड किंवा सोपं आहे, यावरुन CSDS लोकनीतीने सर्वेक्षण केलं होतं. सर्वेक्षणात सामील झालेल्या 62 टक्के लोकांना असं वाटतं की, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सद्यस्थितीत नोकरी मिळणं अवघड झालं आहे. सोबतच 18 टक्के लोकांनुसार, पाच वर्षांच्या तुलनेत काही बदल नाही तर तिच परिस्थिती आहे. रंजक बाब म्हणजे 12 टक्के लोकांनुसार, आधीच्या तुलनेत वर्तमानात नोकरी मिळवणं सोपं झालं आहे. यानुसार, तब्बल दोन तृतीयांश लोकांनुसार, मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात नोकरी मिळवणं कठीण झालं आहे.
59 टक्के लोकांनुसार, शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आंदोलन करणं योग्य...
पंजाबच्या शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो आंदोलनाबाबत लोकांना प्रश्न विचारण्यात आले. सर्वेक्षणात सामील 63 टक्के शेतकऱ्यांनुसार, शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणं योग्य आहे, तर 11 टक्के शेतकऱ्यांनुसार हे केंद्र सरकारविरोधात षडयंत्र होतं. 12 टक्के शेतकऱ्यांना या आंदोलनाची काहीही माहिती नव्हती.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये हे मुद्दे प्रभावी राहण्याची शक्यता...
बेरोजगारी - 27%
महागाई - 23%
विकास - 13%
भ्रष्टाचार - 8%
अयोध्या राम मंदिर - 8%
हिंदुत्व - 2%
भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा - 2%
आरक्षण - 2%
अन्य मुद्दे - 9%
माहिती नाही - 6%
भाजप ज्या गोष्टीवर अवलंबून आहे अशा, राम मंदिर आणि हिंदुत्व सारखे मुद्दे जनतेमध्ये फारसे प्रभावी नसल्याचं वरील आकड्यांवरुन स्पष्ट दिसून येत आहे.जनतेचे खरे मुद्दे बेरोजगारी, महागाई, विकास आहे, ज्यावर राजकीय पक्षांना लक्ष देण्याची आवश्यकता आहे.