गेली काही दिवस सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला. मलिक यांनी अर्ज भरताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. या पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मलिकांनी मानले आभार
नवाब मलिक यांनी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास काही तास बाकी असताना उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे आभार मानले. या नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे. मला बहुसंख्य मतदार पाठिंबा देतील आणि आम्ही यंदा मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघ नक्की जिंकू असा मला विश्वास आहे,असं मलिक यांनी सांगितलं.
दाऊदचा साथीदार...
मलिक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा संदर्भ देत प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपावर टीका केली आहे. सोशल मीडिया नेटवर्क X वर ट्विट करत त्यांनी ही टीका केली. 'दाऊदचा सहकारी आता आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांचा जवळचा मित्र (BFF) झाला आहे. 'दाऊदचा माणूस' आता भाजपा नेतृत्त्व करत असलेल्या आघाडीचा उमेदवार आहे. देशभक्तीचे अधिकृत प्रमाणपत्र वाटणारे आज कुठे आहेत?' असा प्रश्न त्यांनी ट्विट करत विचारला आहे.
भाजपाचा होता तीव्र विरोध
महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेल्या कनेक्शनच्या आरोपाखाली जेलमध्ये जावं लागलं होतं. भाजपानं त्या मु्द्यावर मलिक यांना सातत्यानं लक्ष केलं आहे.
( नक्की वाचा : नवाब मलिकांना विरोध करणाऱ्या भाजपाला सना मलिक यांचं उत्तर, अर्ज भरल्यानंतर म्हणाल्या... )
नवाब मलिक जामीनावर बाहेर आल्यानंतर अजित पवारांच्या पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. भाजपाच्या विरोधामुळे मलिक यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही, अशी शक्यता होती. पण, हा विरोध मोडून मलिक स्वत:साठी आणि मुलगी सना मलिक यांच्यासाठी पक्षाकडून तिकीट मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.