Delhi Election Results : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपानं 70 पैकी 48 जागा जिंकत 27 वर्षांनी सत्ता मिळवली आहे. तर गेली 10 वर्ष प्रचंड बहुमतासह सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला 22 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दिल्लीतील तिसरा प्रमुख पक्ष समजल्या जाणाऱ्या काँग्रेसवर या निवडणुकीतही नामुश्की ओढावली आहे. पक्षाला सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत शून्य जागा मिळाल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
15 वर्ष सत्ता आणि आता...
दिल्लीमध्ये 1998 ते 2013 या कालावधीमध्ये 15 वर्ष सलग काँग्रेसची सत्ता होती. शिला दीक्षित मुख्यमंत्री होत्या. पण आता तो काळ फक्त इतिहासजमा झाला नसून त्यावर नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
काँग्रेलला 2015 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शून्य जागा मिळाल्या होत्या. 2020 मध्ये पक्षाला भोपळा फोडता आला नाही. आता 2025 मध्ये अनेक मोठे दावे करुनही काँग्रेस भोपळा फोडू शकली नाही. दिल्लीतील सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या आहेत.
( नक्की वाचा : Delhi Election Result: काँग्रेस नेत्यानं 12 वर्षांनी घेतला आईच्या पराभवाचा बदला, केजरीवालांना शिकवला धडा )
काँग्रेसची ही नामुश्की इथंच थांबली नाही. काँग्रेसचं 70 पैकी 67 मतदारसंघात डिपॉझिट जप्त झालं आहे. फक्त 3 मतदारसंघात पक्ष डिपॉझिट वाचवण्यात यश आलं आहे. अर्थात काँग्रेसच्या मतांमध्ये या निवडणुकीत दोन टक्के वाढ झाली आहे. 2020 मधील निवडणुकीत काँग्रेसला 4.26 टक्के मतं होती. यंदा त्यांना 6.4 मत मिळाली आहेत.
काँग्रेसवर अर्बन नक्षल वार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या विजयानंतर पक्ष मुख्यालयात केलेल्या भाषणात काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. काँग्रेस परजीवी पक्ष असल्याची टीका त्यांनी केली. 2014 नंतर 5 वर्ष काँग्रेसनं हिंदू होण्याचा प्रयत्न केला. मंदिरात जाणे, जानवं घालणं हे प्रकार करुन भाजपाची मत पळवण्याचा प्रयत्न केला. पण, काही झालं नाही. आता त्यांची नजर राज्यातील पक्षांवर आहे.
इंडी आघाडीतील पक्षांना काँग्रेसचा डाव समजला आहे. दिल्लीमध्ये या पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न केला. ते काँग्रेसला रोखण्यात यशस्वी झाले. पण आपली आप-दा मधून सुटका करु शकले नाहीत. स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेस आता उरलेली नाही. आज काँग्रेस अर्बन नक्षलवाद्यांचं राजकारण करते. काँग्रेसचे नेते जेव्हा ते भारतासाठी लढत आहेत असं सांगतात त्यावेळी ते नक्षलवाद्यांबाबत बोलत असतात असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.