Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत हाय व्होल्टेज लढत; सक्षणा सलगरांचं अर्चना पाटलांना खुलं आव्हान

महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी

Dharashiv Zilla Parishad Election : महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. धाराशिवच्या तेर गटात हाय व्होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. येथे भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून धाराशिव लोकसभेची निवडणूक लढविलेल्या आणि भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय सक्षणा सलगर यांनी शड्डू ठोकला आहे. 

घराणेशाहीच्या विरोधात सामान्य उमेदवार असला पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा असून लोकांच्या आग्रहाखातर तेर गटातून निवडणूक लढणार असल्याची घोषणाच सलगर यांनी केली आहे. तसेच आपण जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची दावेदार नसल्याचे देखील त्यांनी जाहीर केलं आहे.

नक्की वाचा - Maharashtra Politics: झेडपी निवडणुकांसाठी काँग्रेसची मोठी खेळी! नव्या पक्षाशी हातमिळवणी; भाजपची डोकेदुखी वाढली

एखाद्या सामान्य गृहिणीला ते पद मिळाले पाहिजे, असे सांगत अर्चना पाटलांनी ही मी अध्यक्षपदाची दावेदार नाही अशी घोषणा करावी असं खुलं चॅलेंज सक्षणा सलगर यांनी दिलं आहे. सक्षणा सलगर यांनी तेर गटातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने आगामी काळात जिल्हा परिषदेच्या या गटात जोरदार राजकीय घमासान होण्याची शक्यता आहे.