- धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे
- एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना शिंदे गटाच एकच खळबळ उडाली आहे.
- ऑडिओ क्लिपमध्ये जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे यांच्यातील संवाद
ओंकार कुलकर्णी
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात एक ऑडिओ बॉम्ब फुटला आहे.धाराशीव जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. धाराशिव जिल्ह्यातून समोर आलेल्या एका ऑडिओ कॉल रेकॉर्डिंगने संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे गटातील शिवसेना भाजपने अक्षरशः ‘हायजॅक' केली आहे का, असा गंभीर आणि खळबळजनक प्रश्न उपस्थित करणारी ही कॉल रेकॉर्डिंग सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धाराशिव शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे यांच्यातील हे कथित संभाषण असल्याचा दावा केला जात आहे.या ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि नेतृत्वावरचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
या व्हायरल क्लिपमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेची अधिकृत उमेदवारी म्हणजेच एबी फॉर्म भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्याकडे देण्यात आल्याचा गंभीर आरोप राजन साळवी यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संभाषणात साळवी यांनीच तिकीट दिल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. याआधीही तिकीट वाटपावरून धाराशिव, कळंब आणि तुळजापूर तालुक्यांत शिवसेनेत नाराजी आणि अंतर्गत असंतोष स्पष्टपणे समोर आला होता. अशातच आता हा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने शिवसेनेतील वाद अधिकच तीव्र झाला आहे.
या ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि सत्तासंघर्ष उघडपणे समोर आला आहे. या क्लिपमध्ये युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे आणि जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यातील संवाद ऐकायला मिळतो.या संभाषणात शिवसेनेचे अधिकृत एबी फॉर्म भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे गेल्याचे राजन साळवी यांनी मान्य केल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, अविनाश खापे यांनी या संपूर्ण ऑडिओ रेकॉर्डिंगमधील मुद्दे सत्य असल्याचे सांगत संबंधित विषयांना दुजोरा दिला आहे.
या गंभीर आरोपानंतर प्रकरण राजकीयदृष्ट्या अधिक तापले आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने हस्तक्षेप करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेत कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. तसेच जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यावर होत असलेले आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचा दावा करत त्यांनी साळवी यांची उघडपणे पाठराखण केली आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमधील तणाव आणि कुरबुरी ही काही पहिल्यांदाच उघडकीस आलेली बाब नाही. याआधीही माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर सभांमधून शिवसेनेतील एका गटावर थेट आरोप केले होते.“शिवसेनेचे काही गट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या खिशात गेले आहेत,” असा सनसनाटी दावा त्यांनी केला होता. या वक्तव्यामुळे त्यावेळीही जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
फक्त जिल्हा परिषदच नव्हे तर धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणुकीतही शिवसेना भाजपमधील मतभेद उघड झाले होते. भाजपने सुरुवातीला युतीचे गाजर दाखवून शिवसेनेला गाफील ठेवले. मग ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती तोडत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यांनी केला होता. मुंबईतून महायुतीची अधिकृत घोषणा, त्यानंतर स्थानिक पातळीवर झालेली युतीची मोडतोड आणि आता समोर आलेला हा नवा ऑडिओ बॉम्ब या सर्व पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राज्यातील वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेतात, दोषींवर कारवाई होते की तडजोडीचा मार्ग निवडला जातो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निर्णयावरच धाराशिव जिल्ह्यातील महायुतीचे भवितव्य आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.