महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा न मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातरच आता उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यात पक्षानं जाहीर केलेल्या उमेदवाराला कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. बच्छाव या नाशिकच्या राहणाऱ्या असल्यानं त्यांना कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला आहे. या उमेदवारीच्या विरोधात नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तुषार शेवाळे तसंच धुळे जिल्हा अध्यक्ष श्यामाकांत सनेर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
काय आहे आक्षेप?
काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शोभा बच्छाव मालेगाव येथील तुषार शेवाळे यांच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांनी विरोध केला. 'आयात उमेदवार चालणार नाही, शोभा बच्छाव परत जा,' अशी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तुषार शेवाळे यांना उमेदवारी द्या. बच्छाव यांची उमेदवारी रद्द करा अशी या कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली. यावेळी बच्छाव यांनी कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी बच्छाव यांना कार्यलयातून परत पाठवले.
नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी यावेळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्र काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांना उद्देशून त्यांनी तसं पत्र पाठवलं आहे.
धुळ्यातही विरोध
नाशिक जिल्ह्यासह धुळ्यातही काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बच्छाव यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. या उमेदवारीच्या निषेधार्थ काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी राजीनामा दिला. लोकसभा मतदारसंघासाठी आम्हाला बाहेरचा उमेदवार नको. मतदारसंघातील उमेदवार हवा. भाजपा उमेदवाराला पराभूत करणारा हवा. नेक नेत्यांनी पक्ष सोडला पण, आम्ही इमान इतबारे काम केलं. त्यानंतरही पक्षानं आमच्यावर अन्याय केला. गरज पडली तर काँग्रेस पक्षाला धडा शिकवू', असा इशारा सनेर यांनी दिला.