Thane Municipal Corporation Election 2026 : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवरील कामकाजाकरिता निवडणूक विभागाकडून बजावण्यात आलेले आदेश नाकारल्याप्रकरणी ठाण्यातील एका प्रसिद्ध शाळेच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
ठाणे महापालिका प्रशासनाकडून आधी नोटीस, मग कारवाई
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर विविध शासकीय-निमशासकीय आस्थापना तसेच खासगी शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे कर्मचारी ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल शाळेत नियुक्तीचे आदेश बजावण्यासाठी गेले असता शाळेच्या मुख्याध्यापिका विमलेश सिंधू यांनी आदेश स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर दुसऱ्यांदाही अधिकृतरीत्या आदेश बजावण्यात आले, मात्र तरीही शाळेकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. यावर ठाणे महापालिका प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली, ती स्वीकारण्यास देखील शाळेने नकार दिला.
शाळेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल
निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करणे हे कायद्याने बंधनकारक असून मतदानाचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या कर्तव्याचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी महापालिका निवडणूक विभागाने रेन्बो इंटरनॅशनल शाळेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुख्याध्यापिका व शाळेविरोधात भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 व इतर अनुषंगिक कलमांन्वये पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.