लोकसभेतील पराभव झटकत महायुतीने विधानसभेत जोरदार मुसंडी मारली आहे. लोकसभेला सर्वात जास्त फटका हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता. त्यानंतर त्यांनी जोरदार कमबॅक केलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी विरोधकांना चिमटे काढले आहेत. महायुतीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानतो, असं वक्तव्य मिटकरी यांनी केले आहे. शिवाय शरद पवार गटातून निवडून आलेले काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचेही मिटकरी म्हणाले. त्याच बरोबर जयंत पाटील जरी आमच्या पक्षात आले तरी त्यांचं स्वागत करू असं ही ते म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मविआ आमच्यासाठी देवाच्या भूमिकेत आहे. दया करणे जे पुत्रासी | ते चि दासा आणि दासी |तुका म्हणे सांगू किती ? | तो चि भगवंताची मूर्ती असा अभंग ही त्यांनी म्हटला आहे. बाळासाहेब थोरात,पृथ्वीराज चव्हाण, बच्चू कडू पराभूत झाले आहेत. जयंत पाटील पराभूत होता होता वाचले आहेत. हे सगळं शॉकिंग आहे. भाजपच्या 90 जागा येतील असं आम्हाला वाटलं होतं. पण प्रत्यक्षात भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या.
ट्रेंडिंग बातमी - पाडा पाडा पाडा! असं पवारांनी ज्या मतदार संघात सांगितलं, तिथं काय झालं?
जेवढी अपेक्षा केली होती त्या पेक्षा जास्त यश महायुतीला मिळाल्याचं ते म्हणाले. शिवाय भाजपला ज्या अर्थी 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत, त्या अर्थी मुख्यमंत्रिपदा बाबतचा प्रश्नही मार्गी निघाला आहे. त्यावर कोणता प्रश्न उपस्थित होईल असं वाटत नाही असं सांगत मिटकरी यांनी पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल असे संकेत दिले आहेत. विरोधकांनी आता पराभव स्विकारला पाहीजे. त्यांनी आत्मचिंतन करायला पाहीजे. तुतारी गाजराची पुंगी होणार आहे, असे मी म्हणायचो ते तसेच झाले आहे असंही त्यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - दिलीप वळसे पाटील हरलेली बाजी जिंकले, तुतारी - पिपाणीच्या घोळ पथ्थ्यावर
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चांगलेच चिमटे काढले आहे. जयंत पाटील यांचं भाषण होतं की जर आपण सत्तेत आलो नाही, तर कुत्रं देखील विचारणार नाही. त्यांच्यासारख्यांचे स्वागत आहे. जिथे सत्ता असते तिथे विजयी आमदार सुद्धा जात असतात. शिंदे यांच्याकडे इनकमिंग वाढेल. तसेच अजित पवारांकडेही जोरदार इनकमिंग होईल. आताच 5-6 आमदार संपर्कात आहेत. नावं सांगितली तर त्यांचा कोंडमारा होईल. खोटं नाही बोलत असं ते म्हणाले. बारामती जशी अजित पवारांची तसंच राष्ट्रवादी काँग्रेसभोवतीही अजित पवारांचे वलय आहे हे सिद्ध झालं असा दावा त्यांनी केला.