विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शरद पवारांची काही भाषणं गाजली. त्या पैकी काही भाषणात त्यांनी यांना पाडा पाडा पाडा असं आवाहन मतदारांना केलं होतं. ज्या ज्या मतदार संघात पवार गेले आणि त्यांनी पाडण्याचे आवाहन केले त्या मतदार संघात नक्की निकाल काय लागणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. शिवाय मला सोडून जो जातो तो परत निवडून येत नाही असंही शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांना पाडण्याचे आवाहन केलेल्या मतदार संघात नक्की निकाल काय लागला यावर एक नजर टाकूयात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवारांनी माढा, इंदापूर, कागल, आंबेगाव,वाई, वडगावशेरी या मतदार संघात घेतलेल्या सभा चांगल्यात गाजल्या. या मतदार संघात उभ्या असलेल्या अजित पवार गटाच्या उमेदवारांनी गद्दारी केली आहे. त्यांना तुम्ही पाडा. शिवाय साधंसूधं पाडायचं नाही. तर जोरात पाडायचं असं आवाहनही पवारांनी केलं होतं. त्यामुळे इथं असलेल्या उमेदवारांना धडकी भरली होती. त्यांची धाकधूक वाढली होती. प्रत्यक्षात सहा पैकी दोन मतदार संघात पवारांच्या आवाहानाला मतदारांनी प्रतिसाद दिला. मात्र चार मतदार संघात अजित पवारांचे शिलेदार निवडून आले.
ट्रेंडिंग बातमी - दिलीप वळसे पाटील हरलेली बाजी जिंकले, तुतारी - पिपाणीच्या घोळ पथ्थ्यावर
माढा आणि वडगावशेरी या मतदार संघात पवारांनी केलेल्या आवाहानाला मतदारांनी प्रतिसाद दिला. माढ्यातून शरद पवार गटाचे अभिजीत पाटील हे विजयी झाले. तर वडगावशेरीतून बापूसाहेब पाठारे हे विजयी झाले. वडगावशेरीतून सुनिल टिंगरे यांचा पाठारे यांनी पराभव केला. टिंगरे हे अजित पवार गटाकडून मैदानात होते. तर माढ्यात रणजीत शिंदे यांचा अभिजीत पाटील यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. त्यामुळे या दोन मतदार संघात पवारांच्या आवाहानाला प्रतिसाद मिळालेला दिसतो.
पण अन्य चार मतदार संघात मात्र मतदारांनी पवारांचे ऐकले नाही. आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील हे अगदी काठावर निवडून आले. त्यांनी शरद पवार गटाच्या देवदत्त निकम यांचा अवघ्या अडीच हजार मतांना पराभव केला. इंदापूर मतदार संघातूनही दत्ता बारणे यांच्या बाजूनेच मतदारांनी मतदान केले. इथे हर्षवर्धन पाटील हे मागे राहीले. कागलमध्ये हसन मुश्रीफही विजयी झाले. त्यांनी समरजी घाटगे यांचा पराभव केला. त्यामुळे मुश्रीफही पवारांच्या आवाहनानंतर विजयी झाले. त्यांचा पराभव होवू शकला नाही. तर वाईमध्ये ही मकरंद पाटील विजयी झाले.
ट्रेंडिंग बातमी - देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर
हे मतदार संघ शरद पवारांचे एकेकाळी गड मानले जात होते. पण यावेळी या गडांनीच पवारांना धक्का दिला.या पराभवा मुळे पवारांचा करिश्मा संपला आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. लोकसभेत शरद पवारांनी अजित पवारांना धोबीपछाड दिली होती. पण विधानसभेत मात्र अजित पवारांनी शरद पवारांना जोर का झटकाच दिला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world