समाधान कांबळे
हिंगोली लोकसभेचे माजी खासदार शिवाजी माने हे शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळेस लोकसभेत पोहोचले होते. मात्र त्यानंतर त्यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण त्यांचं तिथेही काही झालं नाही. राष्ट्रवादीला काँग्रेसला सोडचिठ्ठी गेत त्यांनी काँग्रेसचा हात पकडला. मात्र काँग्रेसमध्ये ते जास्त काळ रमले नाहीत. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपला आपलसं केलंय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यानंतर त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाच्या प्रश्नावर रान उठवले होते. सापळी धरण रद्द करावं अश्या इतर मागण्यासाठी त्यांनी सिंचन संघर्ष मधून आवाज उठवला होता. हिंगोली जिल्ह्याची जलवाहिनी असलेल्या कयाधू नदीवर बंधारे बांधून सिंचनाचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी तात्कालीन राज्यपालांसह इतर राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बंधाऱ्याचा प्रश्न मांडला होता. त्यावेळी कयाधू नदीवरील बंधाऱ्याचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन सुद्धा त्यांना देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. सध्याच्या महायुती सरकारच्या काळातही त्यांनी हा प्रश्न मांडला होता.
ट्रेंडिंग बातमी - शहाजी बापूंच्या गडात उद्धव ठाकरेंचं 'काय झाडी काय डोंगर' सभा गाजवली
मात्र या सरकारनेही त्यांना फक्त आश्वासनचं दिलं. जिल्ह्यातील सिंचनाच्या प्रश्नावर वेळोवेळी शासनाकडून फक्त आश्वासनं मिळत होती. त्यामुळे मागील काही दिवसापासून ते नाराज झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा शिवाजी माने यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. पुणे येथे 23 ऑक्टोबरला छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत त्यांनी स्वराज्य पक्षात प्रवेश घेतला. त्यानंतर माजी खासदार शिवाजी माने हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या आघाडी कडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली.
ट्रेंडिंग बातमी - 'मी काय म्हातारा झालोय का? 84 वर्षाचे शरद पवार असं का म्हणाले?
ही चर्चा सुरू असतानाच माजी खासदार शिवाजी माने यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मूळ पक्षात म्हणजेच शिवसेना ठाकरे गटात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे माजी खासदार शिवाजी माने यांनी भाजपमधून, स्वराज्य पक्ष स्वराज्य पक्ष आणि नंतर शिवसेना असा एका महिन्यात तीन पक्षात प्रवास मतदार संघातील जनतेला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार शिवाजी माने यांची पळापळ सुरूच आहे. आता ते शिवसेनेत सक्रिय झाले असले तरी शिवसेना ठाकरे गटांमध्ये किती काळ सक्रिय राहतात हा खरा प्रश्न आहे.