लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला आता वेग आला. सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची घोषणा करत आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली हे गांधी कुटुंबाचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. 2019 साली झालेल्या लोकसभा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा अमेठीमधून पराभव केला होता. तर, सोनिया गांधी रायबरेलीतून विजयी झाल्या होत्या. सोनिया गांधी आता राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळे त्या लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे स्पष्ट झालंय. त्यातच अमेठी आणि रायबरेलीमधून अद्याप काँग्रेसनं उमेदवार जाहीर केला नसल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला होता.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांनी याबाबत एक महत्त्वाचे संकेत दिले आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) किंवा प्रियांका गांधी वाड्रा यापैकी एक जण उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 'एशियानेट न्यूज' वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अँटनी यांनी सांगितलं की, 'तुम्ही अमेठी आणि रायबरेलीबाबतच्या निर्णयाची प्रतीक्षा करा. त्याबाबत अंदाज लावू नका. गांधी कुटुंबातील एक सदस्य उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवेल.'
मविआच्या जागावाटपात काँग्रेसची कोंडी, महत्त्वाच्या जागा गमावल्या
रॉबर्ट वाड्रा उमेदवार असतील का? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला त्यावर तसं होणार नाही, असे संकेत त्यांनी दिले. धर्मनिरपेक्ष पक्षांना गांधी कुटुंबावर पूर्ण विश्वास असल्याचं माजी संरक्षण मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यापूर्वी अमेठी आणि रायबरेलीतील उमदेवारांची घोषणा योग्यवेळी करण्यात येईल, असं उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडेय यांनी सांगितलं होतं.
देशभरात यंदा सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे. यामधील पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी होणार असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील.