Gangapur Khultabad Assembly Election 2024 : मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात यंदा गुंतागुंतीचं चित्र आहे. गेल्या पाच वर्षात राज्यात बदललेल्या परिस्थितीचं प्रतिबिंब या जिल्ह्यातही उमटलंय. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार आहेत. गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघही याला अपवाद नाही.
आधी काँग्रेस आणि नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात 2009 साली चित्र बदललं. त्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे असलेले प्रशांत बंब विजयी झाले. पाच वर्षांनी बंब यांचं चिन्ह बदललं. ते भाजपामध्ये दाखल झाले. बंब यांनी चिन्ह बदललं, पण गंगापूरवासियांनी आमदार बदलला नाही. त्यांना 2014 आणि 2019 मध्ये निवडून दिलं. आता बंब विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज आहेत, पण हा चौकार रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं जोरदार फिल्डिंग लावलीय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे आव्हान?
गेल्या तीन निवडणुकीत नॉट आऊट असलेल्या प्रशांत बंब यांची विकेट काढण्यासाठी महाविकास आघाडीनं सतीश चव्हाण यांना मैदानात उतरवलंय. प्रशांत बंब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश सोनवणे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर वचिंत बहुजन आघाडीकडून अनिल चंडालिया निवडणूक लढवतायत, पण खरी लढत ही प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण यांच्यात होणार आहे.
प्रशांत बंब यांचा रेकॉर्ड
प्रशांत बंब यांची विकेट काढणं आव्हानात्मक का आहे? हे समजून घेण्यासाठी त्यांचा रेकॉर्ड पाहूया. 2009 च्या निवडणुकीत बंब यांनी सर्व प्रस्थापित पक्षांना मागं टाकतं अपक्ष बाजी मारली. त्यानंतर ते सलग तीन टर्मपासून मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. 2014साली त्यांनी सध्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा पराभव केल. तर, मागील विधानसभा निवडणुकीत (2019) शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे चिरंजीव संतोष माने यांचा मोठ्या फरकाने पराभव करत हॅटट्रिक पूर्ण केली. यंदा मागच्या वेळेपेक्षा दुप्पट फरकाने निवडून येणार असल्याचा विश्वास बंब यांनी व्यक्त केला आहे.
( नक्की वाचा : विधानसभा निवडणुकीत AIMIM चा भाजपाला फायदा होतो का? आकडेवारीतून समजून घ्या सत्य )
मागील तीन टर्ममध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा बंब प्रचारात मांडत आहेत. मात्र, काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेतही राहिले आहेत. विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्ज माफीला केलेला विरोध, शिक्षकांबाबतची वक्तव्य यामुळे त्यांचं नाव राज्यभर गाजलं. तसंच नुकताच प्रचारादरम्यान त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.
या व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांना मागील पंधरा वर्षात काय केलं हा प्रश्न काही तरुणांनी विचारला. त्याला उत्तर देताना बंब यांनी अरेरावी केल्याचा कथित आरोप करण्यात येतोय. या सर्व कारणांमुळे गंगापूरचं मैदान जिंकणं हे बंब यांच्यासाठी आव्हानात्मक बनलंय.
कोण आहेत सतीश चव्हाण?
सतीश चव्हाण हे मागील 17 वर्षांपासून पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवारांसोबत होते. मागच्या 2 वर्षांपासून ते गंगापूर खुलताबाद या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत होते. मात्र महायुतीत ही जागा भाजपाकडं असल्यानं त्यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि उमेदवारी देखील मिळवली.
( नक्की वाचा : सज्जाद नोमानी म्हणतात, महाराष्ट्र नाही तर दिल्ली सरकारही टार्गेट! शेलारांनी शेअर केला Video )
सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीने मविआतील अनेक नेते नाराज असल्याचं दिसत होते. त्यातील अनेकांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली होती. पण त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागं घेतली. आता या अंतर्गत विरोधाचा कितपत फटका सतीश चव्हाण यांना बसणार हे पाहणं ही महत्वाचे ठरणार आहे.
सतीश चव्हाण यांनी गेल्या काही वर्षात मतदारसंघातील अनेक गावांमध्ये आमदार निधी देवून कामांचा धडाका लावला होता. मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या काकासाहेब शिंदेंच्या भावाला नोकरी दिल्याने देखील ते चर्चेत होते. आता या सगळ्यांचा त्यांना किती फायदा होणार हे निकाल लागल्यावरच समजेल.