अभिषेक भटपल्लीवार
विधानसभा निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शेवटपर्यंत पक्षाची उमेदवारी मिळेल या आशेवर अनेक जण होते. पण उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. त्यामुळे त्यांनी बंडखोरीचा मार्ग अवलंबला आहे. पक्षासाठी सच्चा कार्यकर्ता म्हणून काम केले. पक्षासाठी झिजले. त्या पक्षानेच बाजूला केले. त्यामुळे त्याच पक्षा विरोधात आता लढावे लागत आहे. अशीच घटना चंद्रपूर विधानसभा मतदार संघात घडली आहे. पक्षा विरोधात बंडखोरी करावी लागत असल्याने बंडखोर उमेदवाराला आपले आश्रू रोखता आले नाहीत. ते ढसाढसा रडू लागले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार हे शेवटपर्यंत ठरत नव्हतं. या मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून ब्रिजभूषण पाझारे हे प्रयत्नशील होते. पाझरे हे भाजपचे निष्ठवान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सुधीर मुनगंटीवारांचे ते खंदे समर्थक आहेत. पाझारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी स्वत: मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले होते. शिवाय ते दिल्लीत ही गेले होते. पण त्यांच्या प्रयत्नांना काही यश आले नाही. रिकाम्या हाताने मुनगंटीवार यांना परतावे लागले होते.
भाजपने शेवटच्या क्षणी ब्रिजभूषण पाझारे यांना वगळून विद्यमान अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना उमेदवारी जाहीर केली. किशोर जोरगेवार हे आधी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संपर्कात होते. मात्र ऐन वेळी त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेशही झाला. लागलीच त्यांना उमेदवारीही मिळाली. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. मुनगंटीवार यांनी पाझारे यांच्यासाठी ताकद लावली होती. जोरगेवारांच्या उमेदवारीलाही विरोध केला होता. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.
ट्रेंडिंग बातमी - महाविकास आघाडीत कुठे कुठे मैत्रीपूर्ण लढती, माघार कोण घेणार?
शेवटी जोरगेवार यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली.जोरगेवार यांचा भाजप प्रवेशाला टोकाचा विरोध करणाऱ्या पाझारे यांनी त्यानंतर बंड करण्याचा निर्णय घेतला. पाझारे यांनी नामांकन अर्ज दाखल केला. नामांकन अर्ज दाखल करायला जात असताना पाझारे भावनीक झाले होते. त्यांच्या समोर भाजप कार्यकर्ते आले यावेळी त्यांना आश्रू अनावर झाले. ते ढसाढसा रडायला लागले. त्यांचा तो व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. पाझारे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षापासून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे चंद्रपूर मतदारसंघात त्यांनी कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण केली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे जोरगेवार यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.