जळगावमध्ये काटे फिरणार? भाजपचे 25 नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात?

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

लोकसभा निवडणूक जसजशी पुढे सरकत आहे. तसतशी निवडणुकीतील चुरस वाढत आहे. शिवाय प्रत्येक जण एकमेकाला शह-काट-शह देण्यातही अग्रेसर आहे. जळगाव लोकसभेतही आता ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. जळगाव लोकसभेत स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. याबाबत स्थानिक भाजपमध्ये नाराजी असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे भाजपचे जवळपास 25 नगरसेवक हे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. जळगावमध्ये भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याचेही ठाकरे गटाचे म्हणणे आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

ठाकरे गटाच्या संपर्कात कोण? 

भाजपचे 25 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा  शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन यांनी केला आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारा बद्दल या सर्वांमध्ये नाराजी आहे. हे नगरसेवकर शरीराने भाजप बरोबर आहेत. पण शिवसेनेच्या बैठकांना हजर राहून ते शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचा दावाही महाजन यांनी केला आहे.  हे सर्व नगरसेवक भाजपमधील हुकुमशाहीला कंटाळले आहेत. त्यामुळे ते लवकरच शिवसेना ठाकरे गटाचे काम लोकसभा निवडणुकीत करतील असाही दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे जळगाव भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा - नागपूर लोकसभा मतदारसंघप्रकरणी भाजप उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत

भाजपने कापले होते उन्मेष पाटील यांचे तिकीट 

जळगाव लोकसभेतून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळे भाजपमधील एक गट नाराज झाला होता. त्यानंतर पाटील यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. शिवाय आपले समर्थक करण पवार यांना उमेदवारीही मिळवून दिली आहे. करण पवार यांना निवडून आणण्यासाठी उन्मेष पाटील यांनी कंबर कसली आहे. 

जळगावमध्ये  वाघ विरूद्ध पवार 

जळगाव लोकसभेत भाजपच्या स्मिता वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात थेट लढत होत आहे. करण पवार यांनी वाघ यांच्या समोर तगडं आवाहन उभे केले आहे. त्यामुळे इथली लढत रंजक झाली आहे. शिवाय भाजपचा एक मोठा गट पवार यांच्या मागे उभा आहे. तर महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे वाघ यांच्यासाठी ताकदीने काम करत आहेत. ही वाघ यांच्यासाठी जमेची बाजू आहे.   

Advertisement