सिंधुदुर्गात सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यात 3 मेला उद्धव ठाकरेंची सभा कणकवलीत होत आहे. या सभेच्या आधीच राणे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. अशात ठाकरेंना बळ देणारी आणि राणेंचे टेन्शन वाढवणारी एक घटना होण्याची दाट शक्यता आहे. ठाकरेंच्या सभे वेळी सिंधुदुर्गातील एक बडा नेता आणि माजी आमदार ठाकरेंच्या गोटात सहभागी होण्याची जोरदार चर्चा आहे. तसे झाल्यास शिवसेना ठाकरे गटाला निश्चितच ताकद मिळणार आहे. शिवाय सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनाही त्याचा फायदा होणार आहे. कारण याच नेत्यांने राणेंबरोबर सर्वात आधी सिंधुदुर्गात दोन हात केले होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिंधुदुर्गातला तो नेता कोण?
माजी आमदार परशुराम उपरकर असे त्यांचे नाव आहे. परशुराम उपरकर हे मुळचे शिवसैनिक आहेत. पण मध्यंतरीच्या काळात त्यांनी शिवसेनेची साथ सोडली आणि त्यांनी मनसेच्या राज ठाकरेंची साथ केली होती. मनसे वाढवण्यासाठी उपरकरांनी सिंधुदुर्गात काम केले. पण पक्षातील मतभेद आणि वरिष्ठांकडून होणारा हस्तक्षेप यामुळे उपरकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. शिवाय आपण लवकरच सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याकडून मिळालेल्या माहिती नुसार उपरकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत हे जवळपास निश्चित आहे. ठाकरेंची 3 मे ला कणकवलीत सभा होत आहे. त्याच वेळी ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - ठाणे - कल्याण लोकसभेची जागा अखेर शिंदे गटाकडे; उमेदवारांच्या नावांची घोषणा
कोण आहेत परशुराम उपरकर?
परशुराम उपरकर हे मुळचे शिवसैनिक आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर उपरकरांनी राणें विरोधात एकहाती किल्ला लढवला होता. शिवाय मालवण पोटनिवडणुकीत उपरकर यांनीच राणें विरोधात लढत दिली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. मात्रनंतर शिवसेनेने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. पुढे त्यांनी शिवसेनेची साथ सोडली आणि मनसेत प्रवेश केला होता. मात्र मनसेतही अंतर्गत मतभेदा मुळे त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. काही काळ ते राजकारणापासून दुर होते. आता ते पुन्हा सक्रीय झाले आहेत. ते पुन्हा एकदा आपल्या जुन्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपरकरांच्या घर वापसीची जोरदार चर्चा सध्या सिंधुदुर्गात रंगली आहे.
ठाकरेंची ताकद वाढणार?
परशुराम उपरकर यांच्या रूपाने एक नेता शिवसेना ठाकरे गटाला मिळणार आहे. तसे झाल्या ठाकरेंची ताकद वाढणार आहे. उपरकर यांना मानणारा एक मोठा वर्ग सिंधुदुर्गात आहे. याचा फायदा थेट शिवसेनेला होईल. शिवाय उपरकर हे राणेंचे कट्टर विरोधक मानले जातात ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. राणेंना विरोध करणारे अनेक नेते कालांतराने राणें बरोबर गेले पण उपरकर हे राणें सोबत गेले नाहीत.