काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी (11 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिसवा सरमा यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. ते झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते.
योगी आदित्यनाथ यांची ‘बंटेंगे तो कटेंगे' ही घोषणा सध्या जोरदार चर्चेत आहे. भाजपानं महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हा प्रमुख मुद्दा केला आहे. खरगे यांनी निवडणूक प्रचारसभेत या घोषणेवर जोरदार टीका केली.
ते साधूंचे कपडे घालतात. पण, लोकांमध्ये ‘बंटेंगे तो कटेंगे' ही भाषा बोलतात. हे साधूचं काम आहे का? या प्रकारची भाषा दहशतवादीच बोलू शकतो. साधू बोलू शकत नाही. काँग्रेस अध्यक्ष इथंच थांबले नाहीत. त्यांनी योगींवर टीका करताना म्हंटलं की, त्यांनी भगवं वस्त्र हे पंतप्रधानांसारखं खोटं बोलण्यासाठीच घातलं आहे का?'.
( नक्की वाचा: Vote Jihad : 'व्होट जिहाद'च्या आरोपांना उत्तर देताना ओवैसींना आठवले पूर्वज, म्हणाले... )
योगी हे दयाळू असतात. पण, त्यांनी अनेकांची घरं बुलडोझर लावून उद्धवस्त केली आहेत. राजीव गांधी यांना मानवी बॉम्बनं उडवण्यात आलं. त्यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. ते तुकडे जोडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण, हे सर्व करणाऱ्यांना सोनिया गांधी यांनी माफ केला. या गोष्टीला करुणा म्हणतात.
भाजपा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे, असा आरोप खरगे यांनी केला. 'बटोंगे तो कटोंगे' बोलणारे स्वत:च लोकांमध्ये फूट पाडत आहेत. भाजपानं लोकांसाठी काहीही केलं नाही. ते देशाला घाबरवतात. ते निवडणुकीच्या तोंडावर आमच्या लोकांना ईडी आणि इन्कम टॅक्सची भीती दाखवतात.'
खरगे यांनी यावेळी आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही इशारा दिला. 'आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या झारखंडमधील कार्यकर्त्यांना घाबरवत आहेत. आम्ही इंग्रजांना घाबरलो नाही, तर यांना काय घाबरणार? आमची एक घोषणा आहे, ''हम डरेंगे तो मरेंगे, इसलिए हम डरेंगे नहीं', असं खरगे यांनी सांगितलं.