- कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती असून काही प्रभागांत थेट लढत
- केडीएमसी पॅनल क्रमांक 29 मध्ये शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
- या प्रभागात दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.
अमजद खान
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती आहे. मात्र यामध्ये एक पॅनल असे आहे, ज्यामध्ये भाजपच्या उमेदवारांसमोर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रिंगणात आहेत. या पॅनलमध्ये कोणताही मोठा नेता प्रचाराला आलेला नाही. हट्ट होता म्हणून हट्ट पुरविण्यासाठी युती असताना शिवसेना नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे, असा आरोप भाजपने केला आहे. तर आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत असल्याचे प्रत्यूत्तर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने दिले आहे.
महायुतीचा प्रचार कल्याण डोंबिवलीत जोरात सुरु आहे. अनेक बंडखोर देखील मैदानात आहेत. बंडखोरांना शांत करण्यासाठी शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भरपूर प्रयत्न केले. काहींची बंडखोरी शमविली. तर काही बंडखोर मैदानात उभे ठाकलेले आहे. केडीएमसीचे पॅनल क्रमांक 29 हे डोंबिवली पूर्वेत आहे. या पॅनलमध्ये शिवेसना भाजपची थेट लढत आहे. या पॅनलमध्ये आधी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाली होती. परंतू शिवसेनेने दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने ही निवडणूक थेट भाजप विरुद्ध शिवसेना झाली आहे.
पॅनल क्रमांक 29 अ मधून भाजपच्या कविता म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेनेच्या रुपाली म्हात्रे, ब मधून भाजपच्या आर्या नाटेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या रंजना पाटील, क मधून भाजपचे मंदार टावरे यांच्या विरोधात शिवसेनेचे नितीन पाटील हे उमेदवार आहे. ड मधून भाजपच्या अलका म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेनेचे रवी पाटील उभे ठाकले आहे. या पॅनलमध्ये प्रचारासाठी भाजप आणि शिवसेनेचे नेते फिरकले नाही. हा प्रभाग दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी वाऱ्यावर सोडला आहे का अशी चर्चा सुरू आहे. या संदर्भात भाजपचे उमदेवार मंदार टावरे यांनी आपली भूमीका स्पष्ट केली आहे.
शिवसेनेकडून उभे असलेले उमेदवार हे भाजपकडून निवडून आले होते. राज्यात सत्ता परिवर्तनानंतर ते शिवसेनेत गेले. या पॅनलमध्ये महायुती का नाही तर एका कुटुंबाने तीन लोकांचा तिकीटांचा हट्ट होता. तो हट्ट शिवसेनेने पुरविला. काही हरकत नाही. भाजप ही विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवित आहे. त्यामुळे या पॅनलमध्ये भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय होणार यात तीळमात्र शंका नाही असं ते म्हणाले. या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवी पाटील यांनी सांगितले, प्रभागापैकी आयरे गावात जास्त समस्या आहे. एकही रस्ता नाही. मुख्य रस्ते सोडले तर एकही रस्ता चांगला नाही. या 122 प्रभागात चार झोपडपट्ट्या आहेत. संपूर्ण आयरे गाव झोपडपट्टी करुन टाकला आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवित असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.