Poonam Mahajan EXCLUSIVE NDTV BMC Powe Play: "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. राजकीय भविष्यासाठी ते एकत्र आले आहेत. लोकांना सगळं समजत आहे. पुढे अंधार दिसत आहेत, म्हणून ते एकमेकांचा हात पकडत पुढे जात आहेत.. अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी केली आहे. NDTV नेटवर्कतर्फे आयोजित 'NDTV BMC Power Play' या विशेष कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.
काय म्हणाल्या पूनम महाजन?
"मातृभाषेची अस्मिता प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा चुकीचा नाही. मात्र भाषेच्या अस्मितेवरुन राजकारण करणे चुकीचे आहे. हा मुंबई निवडणुकीतील मोठा मुद्दा नाही. इथे बसलेला युवक मी मराठी बोलणार नाही असं म्हणणार नाही. त्यामुळे हा मुद्दा आहे मात्र तो राजकारणाचा विषय नाही. मराठी अस्मिता हा फक्त निवडणुकीचा मुद्दा राहीला नाही पाहिजे. आम्ही मुंबईचा विकास करणार आहोत. मुंबईचा विकासामुळे महाराष्ट्राच्या विकासात भर भडते, त्यासाठी आमचं प्राधान्य आहे, असे म्हणत पूनम महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
NDTV BMC Power Play LIVE : "मुंबईचा महापौर शिंदेंचा की भाजपचा हे आधी ठरवा", सुषमा अंधारे
ठाकरे बंधुंना टोला
"रस्ते, शिक्षण, पाण्याची व्यवस्था हे विकासाचे आमचे मुद्दे आहे, इतर मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही.इतकी वर्ष काय केलं हे सांगण्यापेक्षा मराठी अस्मितेच्या मुद्यावर विरोधक बोलतात. मात्र हा मराठी अस्मितेचा मुद्दा आहे की त्यांच्या अस्तित्वाचा आहे, हे पाहावं लागेल. भाऊभाऊ एकत्र आले चांगली गोष्ट आहे. मात्र स्वतःच्या बचावासाठी, पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी एकत्र आले आहेत. पुढे अंधकार दिसत असल्यानेच भाऊ भाऊ एकत्र आले. हे सर्वांना दिसत आहे. जनता वेडी नाही, जनता सर्व काही जाणते," असा टोलाही त्यांनी ठाकरे बंधुंना लगावला.
"निवडणुका आल्या की मराठी अस्मिता आठवते. पण अभिजात भाषेचा दर्जा मराठीला कोणी दिला? आम्ही तो सर्वात आधी दिला. मराठी माणसाची अस्मिता कशी ठेवावी? त्याला वडापावची गाडी देऊन चालत नाही. या गोष्टी १५ तारखेपर्यंत बोलायला बऱ्या वाटतात. मराठी माणूस काही तुमची मक्तेदारी आहे का? मराठी माणसाची अस्मिता आम्हाला शिकवू नये, मराठी माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे," असा टोलाही पूनम महाजन यांनी ठाकरे बंधुंना लगावला.
मुंबईमध्ये महापौर कोणाचा?
"आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, महाराष्ट्रापासून राजकीय सुरुवात झाली आहे. मुंबईकरांची, भारतीय जनता पक्षाचीही इच्छा आहे की मुंबईवर आमची एकहाती सत्ता असावी. मात्र मात्र आम्ही आता युतीमध्ये आहोत. पण मुंबईमध्ये ड्रायव्हर भाजपचा असेल आणि को-पायलट शिवसेनेचा असेल. मुंबईकरांच्या हितासाठी उड्डाण घेऊ. आम्ही अपेक्षा करतो की महापौर भाजपचा असेल आणि उपमहापौर शिवसेनेचा असेल कारण आम्ही सर्वाधिक जागा लढतोय, त्यानुसार असंच होणं अपेक्षित आहे मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ नेते घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world