- भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील युती कल्याण डोंबिवली महापालिकेत तुटेल असे मनसे नेत्याने सांगितले.
- युतीवरून अनेक जण नाराज असल्याचा दावा राजू पाटील यांनी केला आहे.
- कल्याण डोंबिवलीत महाविकास आघाडी एकत्रित लढणार
अमजद खान
भाजप आणि शिवसेनेची युती शब्दश: झाली आहे. मनाने तुटली आहे. जे मनसेत होते त्यांनी निवडणूकीच्या तोंडावर उमेदवारी मिळविण्याकरीता पैसे घेऊन शिवसेना शिंदे गट आणि भाजपात गेले. त्यांना त्या पक्षांकडून उमेदवारी मिळत नाही. ते आता आम्हाला फोन करत आहेत. आम्हाला पुन्हा मनसेत घ्या अशी विनंती करत आहेत. त्यांच्यासाठी मनसेचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत असे स्पष्ट मत मनसे नेते राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना आणि शिंदे गटाची युती येत्या 30 तारखेला तुटेल असा दावाही त्यांनी केला आहे. शिंदे गट आणि भाजपने जे खेळ केले ते त्यांच्याच अंगाशी येतील असं ही ते म्हणाले. भाजप आणि शिवसेनेत युतीवरून अनेक जण नाराज असल्याचं ही त्यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अनेक इच्छूकांना उमेदवारी मिळणार नसल्याने त्यांच्या प्रचंड प्रमाणात नाराजी उफाळून आली आहे. या संदर्भात मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितले की, निवडणूकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाते काही माजी नगरसेवकांना पैसे देऊन, निवडून येतील म्हणून आणि काही लोकांना भिती दाखवून पक्षात घेतले. त्यांना उमेदवारी मिळणार नसेल तर त्यांचा उद्रेक उफाळून येणार. कार्यकर्त्यांचा भावना आहेत. त्यांची नाराजी सहाजीक आहे असं ते म्हणाले. सध्या तरी शिवसेना शिंदे आणि भाजपची युती ही वरवरची आहे. ती लवकरच तुटणार असल्याचं भाकीत ही त्यांनी व्यक्त केले.
पाटील म्हणाले की मनसेची यादी तयार आहे. संध्याकाळपासून एबी फॉर्म देण्यात येणार आहे. सर्वच जागांवर आमची बोलणी संपली आहे. उद्यापासून फॉर्म भरण्यास सुरुवात होईल. येत्या दोन दिवसात उमेदवारी फॉर्म भरुन होती. 122 जागांपैकी 54 जागा मनसेसाठी आहे. उर्वरीत जागा शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी आहेत असं त्यांनी सांगितलं. निवडणुकीसाठी कल्याण आणि डोंबिवलीत नेत्यांच्या प्रचार सभा होणार आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना एक दिवस राखीव ठेवण्याची विनंती केली आहे. महापालिका निवडणूकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट बाजी मारणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय केडीएमसीत मनसेचा महापौर बसेल असा दावा ही त्यांनी केला.
व्यापाऱ्यांना कोणी मारायला जात आहे का ? मुनी लोकांनी त्यांचे काम करावे. राजकीय पक्षांच्या सुपाऱ्या घेऊ नयेत. अनेक जैन लोक आमचे मित्र आहे. व्यापारी आहेत त्यांनी सांगावे त्यांना काही त्रास आहे का ? असं ही पाटील यावेळी म्हणाले. साधू संत लोक पवित्र काम करीत असतात. त्यांनी अशा राजकारणात पडायला नाही पाहिजे. तणाव होत असेल तर ते निवळण्यासाठी काम करावे. निवडणुकीत एखाद्या पक्षाला फायदा होईल असे वक्तव्य करुन त्यांनी त्यांची प्रतिमा डागाळून घेऊ नये. त्यांना नम्रतापूर्वक सांगतो की विचार करुन बोलायला पाहिजे. तुमच्याकडून इतर लोक आदर्श घेत असतात. तो विचार त्यांनी करावा असा सल्ला ही पाटील यांनी दिला.