- प्रशांत जगताप हे 27 वर्षांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संलग्न होते
- पक्षातील तत्त्वांशी तडजोड झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला
- जगताप यांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक आणि 2016-17 मध्ये महापौर पदावर काम केले आहे
महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने प्रत्येक शहरातलं वातावरण चागलचं तापलं आहे. मग ते मुंबई असो की छत्रपती संभाजी नगर असो. यात पुणे ही कुठे मागे नाही. पुणे म्हटलं की दोन चेहरे तसे पटकन डोळ्यासमोर येतात. ते म्हणजे एक रविंद्र धंगेकर आणि दुसरे म्हणजे तात्या वसंत मोरे. हे दोन नेते काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत राहीले आहेत. पण सध्या पुण्यात यांची नाही तर प्रशांत जगताप यांचीच चर्चा होताना दिसत आहेत. जगताप हे शरद पवारांचे कट्टर समर्थक समजले जातात. त्यांनी शरद पवारांची साथ सोडली अन् ते अचानाक प्रकाशझोतात आले. विशेष म्हणजे त्यांनी सत्ताधारी पक्षात न जाता थेट काँग्रेसचा हात पकडला. त्यामुळे अनेकांच्या भूवया ही उंचावल्या आहेत.
प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते. त्यांनी आधी पासूनच शरद पवारांना साथ दिली. जवळपास 27 वर्ष ते शरद पवारांसोबत होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ही ते शरद पवारांसोबत राहीले. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष ही होते. पवारांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी ओळख होती. पण तत्त्वांशी तडजोड करण्याची वेळ येताच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर जगताप यांच्या सारखा मोहरा आपल्या गळाला लावण्यासाठी सगळ्याच पक्षांनी प्रयत्न केले. पण जगताप यांनी काँग्रेसमध्येच जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने पुण्यातील राजकीय पंडीत ही चक्रावून गेले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने बरोबर उद्धव ठाकरे ही त्यांना पक्षात घेण्यासाठी इच्छुक होते. पण प्रशांत जगतापांच्या मनात काही वेगळच सुरू होते. प्रशांत जगताप यांनी 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कामाला सुरुवात केली. म्हणजेच राष्ट्रवादीच्या पक्ष स्थापनेपासूनच ते राष्ट्रवादी सोबत होते. त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिकेत प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून काम केले आहे . ते वानवडी प्रभागातून सतत निवडून येत आहेत. या काळात त्यांनी 2016-17 मध्ये पुणे शहराचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या त्यावेळच्या कामाची दखल शरद पवारांनी ही घेतली होती. सच्चा कार्यकर्त्याच्या कामाची ती पोचपावती होती असं सांगितलं जातं.
पुढे 2021 मध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र 2023 मध्ये पक्षात फूट पडली. शरद पवारांना अनेक नेते सोडून गेले. अजित पवारांच्या गटात एक एक नेता सहभागी होत होता. पण जगताप यांनी तेव्हा ही शरद पवारांची साथ सोडली नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच राहीले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षांने त्यांना संधी दिली. 2024 च्या निवडणुकीत ते हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून मैदानात उतरले. यावेळी त्यांची लढत त्यांचेच एक वेळचे सहकारी चेतन तुपे यांच्या सोबत झाली. तुपे यांना जगताप यांनी कडवी टक्कर दिली. पण त्यांचा अवघ्या 7 हजार मतांनी पराभव झाला.
पुणे काँग्रेसमध्ये सध्या ताकदीचा नेता नाही. अशा वेळी जगताप यांच्या रुपाने पुण्यात काँग्रेसला एक ताकदवान नेता मिळाला आहे. पक्ष प्रवेशानंतर जगताप यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर निरंतर वाटचाल करणे, या वैचारिक पायावर समतावादी समाज घडवणे हे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनाचे ध्येय आहे असे म्हटले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आजपासून मी "काँग्रेस" पक्षात कार्यरत होत आहे. भारताला परकीय सत्तेपासून मुक्त करण्यासाठी काँग्रेसने यशस्वी लढा दिला, आजही काँग्रेस पक्ष भारताला धार्मिक-जातीय द्वेषापासून मुक्त करण्यासाठी लढत आहे. या लढ्याचे नेतृत्व करणारे, संविधानाच्या रक्षणार्थ बलाढ्य शक्तींना आव्हान देणारे राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्त्वात मी एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण ताकदीने योगदान देणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world