अमजद खान, प्रतिनिधी
कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. एकनाथ शिंदे यांना अटकेची भीती वाटत होती, म्हणून ते भाजपासोबत गेले, असा आरोप आदित्य यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंची थेट लायकीच काढली. आरशात पाहिल्यावर आपली लायकी, आपली पात्रता आणि आपली औकात कळेल, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदे यांनी कल्याणमधील प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर दिलं. 'आमच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे तसंच आमच्या आई-वडिलांचे संस्कार आहेत. त्यांच्यावर ज्यांनी संस्कार केले त्यांना प्रश्न विचारा असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )
त्यांच्या तोंडी नेहमी शिव्या-शाप आहेत. महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचं काम त्यांनी केलंय. आपल्या लायकीप्रमाणे आपण बोललं पाहिजे , लायकी नसताना आपण ज्यांच्यावर बोलतो ते जनता बघत असते. 20 तारखेला जनता त्यांना उत्तर देईल. तूमचे योगदान काय, तुमची पात्रता काय, तुमची लायकी काय ? असा सवाल करत आरशामध्ये पाहिलं की पात्रता कळेल असं श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना बजावलं.
( नक्की वाचा : उंटावरुन शेळ्या, वाघाचं कातडं ते रिंगमास्टर; डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांची ठाकरेंविरोधात टोलेबाजी )
कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यापूर्वी दोन वेळा निवडून आले आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर ते पहिल्यांदाच निवडणुकीला सामोर जात आहेत. त्यांना महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचं आव्हान आहे.