तन्मय टिल्लू, प्रतिनिधी
KDMC Election 2026 : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका महायुतीने एकत्र लढली. या निवडणुकीत मोठ्या बहुमताने महायुती निवडूनही आली. अशा स्थितीत गेली अनेक वर्ष नगरसेवक-महापौरांवाचून सुरु असलेला पालिकेचा प्रशासकीय कारभार आता सुरळीत होईल अशी आपेक्षा मतदार करत असताना इथल्या राजकारणात ट्विस्ट आला आहे. पण तो का आला? अचानक शिंदेंच्या शिवसेनेनं मनसे आणि इतर पक्षांना सोबत घेत मॅजिक फिगरची जुळवाजुळव का केली आहे? या सगळ्याची उत्तर शोधायची तर इतिहासाची उजळणी करावी लागेल.
भाजपा-शिंदे सेनेतील कोल्डवॉर
फार नाही अगदी अलीकडेच म्हणजे कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली तो काळ आठवा. भाजपा आणि शिंदेसेनेत कोल्ड वॉर सुरू असल्याचे पाहायला मिळत होत. तसं ते आजही सुरुच आहेच. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या तेव्हापासून महायुतीतील अंतर्गत धुसफूस वाढली. त्याचा केंद्रबिंदू होता डोंबिवली...आणि राजकीय नाट्याचे प्रमुख होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण...
इतिहासाची उजळणी
असं म्हणतात राजकारण समजून घ्यायचं तर इतिहासाची उजळणी करावी लागते म्हणजे सद्यस्थितीतील घडामोडींचे पडद्यामागील अर्थ उलगडणे अधिक सोपे होते. मुळात, या राजकीय नाट्याची सुरुवात झाली ती प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या नेतृत्त्वात होणाऱ्या पक्षप्रवेशांमुळे... अर्थात, हे पक्षप्रवेश काही साधेसुधे किंवा सामान्य कार्यकर्त्यांचे नव्हते.
( नक्की वाचा : KDMC Election 2026 "शिंदे गट म्हणजे MIM"; मनसेच्या पाठिंब्यानंतर राऊतांचा संताप अनावर, राज ठाकरेंना दिला सल्ला )
प्रदेशाध्यक्ष चव्हाणांनी डाव टाकत खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय भाजपच्या गळाला लावण्यास सुरुवात केली. याची सुरुवात झाली ती उबाठाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रेंच्या पक्षप्रवेशामुळे...वरकरणी म्हात्रे हे उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष असले तरी खासदार श्रीकांत शिंदेंशी त्यांची असलेली घनिष्ठ मैत्री काही लपून राहीलेली नाही.
उलटपक्षी ऐन निवडणूकीच्या तोंडावर म्हात्रे पुन्हा शिंदेंकडे जाण्याच्या तयारीत होते अशी कुजबूज त्यावेळी कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात होती. त्याआधीच स्थानिक नेतृत्त्व अधिक बळकट करण्याच्या राजकीय इर्षेने प्रदेशाध्यक्ष चव्हाणांनी म्हात्रेंना गळाला लावले. त्यामुळे ठाकरे गटापेक्षा हा धक्का शिवसेना शिंदे गटालाच अधिक होता.
पुढे शिंदेंसाठी कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुक अवघड करण्यासाठी भाजपने चव्हाणांच्या नेतृत्त्वात फासे टाकायला सुरुवात केली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांच्या मुलाने म्हणजेच दिपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाचे कमळ हाती धरले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी विशेषत: श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता.
( नक्की वाचा : KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीत 'पॉवर गेम' महापौरपदी कुणाची होणार निवड? वाचा कोण आहेत प्रबळ दावेदार )
कधी वाढला संघर्ष?
खरंतर, एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री झाले होते. तेव्हापासूनच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष प्रचंड वाढला. या दोन्ही पक्षांमधली वाद विकोपालाही गेले होते. इतके की भाजपने थेट पालिकेत स्वबळाची भाषा केली. त्यासाठीच भाजपने पद्धतशीरपणे पावलं टाकत एकएक मोहरे गळाला लावले.
मात्र या घाऊक इनकमिंगवरुन महायुतीत तेव्हा घमासान झाले. इतके की शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवरच बहिष्कार टाकला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर कल्याण डोंबिवलीत महायुतीतच निवडणुका लढण्याचं जाहिर करण्यात आलं.
( नक्की वाचा : KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीत शिंदेंना पाठिंबा का दिला? मनसे नेत्यांनी सांगितली A to Z कारणं )
नवा ट्विस्ट काय?
सध्या ज्या पद्धतीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेचा पाठिंबा घेत गट स्थापनेचा दावा केला आहे त्यामागे कल्याण-डोंबिवलीतील स्थानिक राजकारणाची समीकरणं आहेत. श्रीकांत शिंदे या परिसराचे खासदार आहेत. मात्र गेल्या काही वर्षात शिंदेंच्या नेतृत्वाला न जुमानण्याचा चंग भाजपच्या नेतृत्त्वाने घेतला. श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही अशी भूमिकाच लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वाने घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. दुसरीकडे गेली अनेक वर्ष कल्याण डोंबिवली पालिकेवरही शिंदेंचा कंट्रोल राहीला आहे. त्यामुळे आमदार रविंद्र चव्हाणांची कोंडी करण्यात शिंदे पिता-पुत्र संधी सोडत नाहीत अशी ओरड भाजपचे स्थानिक नेते करतात.
गेल्या काही वर्षात स्थानिक पातळीवर शिंदे विरुद्ध भाजप अशा संघर्षाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळेच यंदा पालिकेवर भाजपचेच वर्चस्व असावे या इराद्याने भाजपाने कल्याण डोंबिवलीत रणनिती आखली होती. पण, आता खासदार शिंदेंच्या खेळीने भाजपची गणितं बिघडल्याचं दिसत आहे.
भाजपाचा गेम झाला?
पालिका निवडणुकी दरम्यान पक्ष बळकटीकरणासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेली खेळी डोक्यात ठेऊन थंड डोक्याने खासदार शिंदेंनी भाजपाचा गेम केला का? असा सवाल या राजकीय नाट्याने उपस्थित झाला आहे. जर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात आलंच तर भाजप आणि स्थानिक नेतृत्त्वाचे कर्तेधर्ते प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी नामुष्की ठरेल.
काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चव्हाणांनी आमचा एक मोठा मित्र देखील लवकरच आमच्यासोबत असेल असं विधान मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्या पक्षप्रवेशावेळी केलं होतं. अर्थात त्यावेळी त्यांचा इशारा अप्रत्यक्षपणे राजू पाटील यांच्याकडे होता अशी चर्चा रंगली होती. मात्र आता तेच राजू पाटील खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत कोकण भवनात गटस्थापनेत साथ देताना दिसल्याने राजकारणात कधीही काहीही शक्य आहे हेच अधोरेखित होताना दिसतं... त्यामुळे पुढे काय राजकीय घडामोडी घडणार हे पाहण्यासाठी थोडं थांबावं लागेल...इतकचं!!!