Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय? शाहू महाराज की संजय मंडलिक?

निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवातच मोठ्या वादाने झाली. आताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत. कोल्हापूरचे आहेत का असा सवाल संजय मंडलिक यांनी केला होता.

Advertisement
Read Time: 3 mins

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात नेहमीच काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव राहिला आहे. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते 1998 पर्यंत मधली काही टर्म सोडल्या तर कोल्हापूरने आपलं मत काँग्रेसच्या पारड्यात टाकलं होतं. 2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मंडलिकांनी शरद पवार यांची साथ सोडली. पवारांच्या इतक्या विश्वासू साथीदाराने बंडखोरी करण्यामागे कारण ठरले छत्रपतींच्या घराण्यातून दिली गेलेली उमेदवारी. यंदा देखील शाहू महाराज छत्रपती हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांच्यासमोर महायुतीचे संजय मंडलिक हे उभे आहेत.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यंदा 23 उमेदवार रिंगणात आहेत.  महाविकास आघाडीचे नेते शाहू छत्रपती महाराज विरुद्ध महायुतीकडून संजय मंडलिक ही प्रमुख लढत आहे. गेल्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये 70 टक्के मतदान झाले होते. 

आरोप-प्रत्यारोप

निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवातच मोठ्या वादाने झाली. आताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत. कोल्हापूरचे आहेत का? असा सवाल संजय मंडलिक यांनी केला होता. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही-आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असं संजय मंडलिक म्हणाले होते. या वक्तव्यानंतर त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. यावर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं.  

त्यानंतर शाहू महाराज यांना एमआयएमने देखील पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यानंतरही राजकारण तापलं होतं. एमआयएमच्या घोषणेनंतर महायुतीने महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यामुळे एमआयएमच्या पाठिंब्याचा शाहू महाराजांना फायदा होणार की तोटा? हे देखील निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. 

Advertisement

(नक्की वाचा- Sangli Lok Sabha 2024: जिंकणार तर 'पाटील'च! पण कोणते?; सांगलीकरांचा कौल कुणाला?)

यंदाच्या निवडणुकीतील मुद्दे 

शाहू महाराज यांच्याबाबतीत वंशज हा कळीचा मुद्दा बनला होता. त्याचबरोबर विद्यमान खासदार संजय मंडलिक हे मतदारसंघात फिरलेले नाहीत, अशा चर्चा होत्या. पक्षातील बंडखोरी आणि महापुरात अडकलेल्या गावांना शाहू महाराजांनी केलेली मदत आणि कोल्हापूरचा विकास हे मुद्दे चर्चेत होते. मान गादीला मत मोदीला, मानही गादीला आणि मतही गादीला, घरातून बाहेर न पडलेला उमेदवार हे मुद्दे देखील यंदाच्या निवडणुकीत गाजले. 

(वाचा - Baramati Lok Sabha 2024: नणंद की भावजय? बारामतीचा गड कोणत्या पवारांकडे राहणार?)

मतदानाची टक्केवारी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत 70.70 टक्के मतदान झालं होतं. यंदा मदतानात किंचित वाढ झाली. कोल्हापुरात यावेळी 71.59 टक्के मतदानाची नोंद झाली. 

Advertisement
  • करवीर- 79.61 
  • दक्षिण कोल्हापूर - 70.79
  • उत्तर कोल्हापूर - 65.31 
  • कागल - 75.31 
  • चंदगड- 68.41
  • राधानगरी - 69.77 

(नक्की वाचा : दक्षिण मध्य मुंबईत मतदानाचा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?)

विधानसभा मतदासंघातील ताकद

करवीर, दक्षिण कोल्हापूर, उत्तर कोल्हापूर हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. कागल आणि चंदगड हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहेत.  तर राधानगरी मतदासंघात शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे.

  • करवीर मतदारसंघ- पी एन पाटील (काँग्रेस)
  • दक्षिण कोल्हापूर मतदारसंघ - ऋतुराज पाटील (काँग्रेस)
  • उत्तर कोल्हापूर मतदारसंघ -जयश्री जाधव (काँग्रेस)
  • कागल मतदारसंघ - हसन मुश्रीफ (अजित पवार गट)
  • चंदगड मतदारसंघ - राजेश पाटील (अजित पवार गट)
  • राधानगरी मतदारसंघ - प्रकाश आबिटकर (शिवसेना शिंदे गट)