दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विरूद्ध शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे आमने-सामने ठाकले आहे. शिवसेना भवन याच मतदार संघात येते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही याच मतदार संघात राहातात. मराठी मतदारांचे तसे प्राबळ्य असलेला हा मतदार संघ. धारावी सारखा भागही याच मतदार संघात येतो. शिवसेनेच्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे नेहमीच शिवसेनेच्या मागे उभा राहाणारा हा मतदार संघ यावेळी मात्र कोणाला कौल देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात मतदानाचा घरसलेला टक्का कोणासाठी डोकेदुखी तर कोणाच्या पथ्यावर पडतो याची गणितच आता मांडली जात आहेत.
मतदानाचा टक्का घसरला
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात यावेळी 53.60 टक्के मतदान झाले आहे. हे 2019 साली 55.02 टक्के मतदान झाले होते. म्हणजेच यावेळी जवळपास दिड टक्के मतदान हे कमी झाले आहे. विशेष म्हणजे धारावी विधानसभा सोडता सर्वच विधानसभा मतदार संघात 2019 च्या तुलनेत मतदान कमी झाले आहे. धारावीतले मतदानही अगदी म्हणजे पुर्णांक चाळीस टक्क्यांनीच वाढले आहे. या लोकसभा मतदार संघात चेंबूरमध्ये शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर हे आमदार आहेत. इथेही मतदानाचा टक्के घसरला आहे. अणूशक्तीनगर हा मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेला मतदार संघ आहे. इथला ही टक्का घसरला आहे. इथले प्रतिनिधी हे नवाब मलिक आहेत. मात्र ते सध्या तटस्थ आहेत. त्यामुळे इथले मतदार कोणाला साथ देतात यावरही बरेचशी गणितं अवलंबून आहेत. धारावीमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड प्रतिनिधीत्व करतात. माहिममध्ये शिंदे गटाचे सदा सरवणकर हे प्रतिनिधीत्व करतात. याच मतदार संघातून मागील निवडणुकीत राहुल शेवाळेंना सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. मात्र ते यावेळी राखण्याचे आवाहन शेवाळें समोर असेल. वडाळा आणि सायन मतदार संघात भाजपचे आमदार आहेत.
चर्चेतले मुद्दे कोणते?
दक्षिण मध्य मुंबई लोकसभेत शिवसेना विरूद्ध शिवसेना अशीच लढत होत आहे. या लढतीलाही गद्दार कोण आणि सच्चा शिवसैनिक कोण? असाच रंग दिला गेला आहे. अनिल देसाई हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे ठाकरे यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे स्वत: ठाकरे देसाई यांच्यासाठी मैदानात उतरले होते. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ज्याचा उल्लेख होतो ती धारावीही याच मतदार संघात येते. इथे मुस्लिम, दलित दक्षिण भारतीय मतदार आहे. या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रश्न निवडणुकीत चर्चीला गेला. इथेच 13 हजार पेक्षा जास्त लघुउद्योग आहेत. त्यांच्या प्रश्नांचीही चर्चा या निवडणुकीत झाली. तर शेवाळे यांनी मोदींनी केलेल्या कामांचा आढावा घेतला. मुंबईचा थांबलेला विकास कसा वेगाने पुढे नेत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. शेवाळे 2014 आणि 2019 असे दोन वेळा विजयी झाले आहेत. पुन्हा आपल्यालाच संधी मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे. विकासचे मुद्दे प्रचाराचा भाग असले तरी इथेही गद्दारी, पाठित खंजिर खुपसले, बाळासाहेबांचे विचार, मराठी माणूस हेच मुद्दे केंद्रस्थानी राहीले आहेत. शिवाय राहुल शेवाळे हे कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध असलेले नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. उलट अनिल देसाई हे वरच्या फळीतील नेत्यां बरोबर वावरणारे उच्चभ्रू नेते अशी त्यांनी प्रतिमा आहे. याचीही चर्च प्रचारा दरम्यान झाली.
मराठी मतदार कोणाच्या बाजूने?
मराठी मतदारांचे प्राबल्य असलेला हा मतदार संघ आहे. शिवाय दलित मुस्लिम आणि दक्षिण भारतीयांची संख्याही यात मोठ्या प्रमाणात आहे. माहिम, दादर, वडाळा, सायन, चेंबूर इथे मोठ्या प्रमाणात मराठी मतदार आहेत. हे मतदार तसे शिवसेनेचे मतदार राहीले आहेत. मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर त्यांना आता दोन शिवसेने पैकी एका शिवसेनेला निवडावे लागणार आहे. त्यामुळे हा मतदार कोणाच्या पारड्यात मतं टाकतो ते निर्णायक ठरणार आहे. शिवाय मुस्लिम, दलित आणि दक्षिण भारतीय मतदारांची भूमीकाही महत्वाची ठरणार आहे. मराठी मतदार हे ठाकरेंसाठी प्लस पॉईंट असले तरी दलित मुस्मि मते जर ठाकरेंकडे वळली तर तो त्यांच्यासाठी बोनस असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय मागील मते शेवाळे हे आपल्या ताकदीवर किती प्रमाणात खेचून आणतात यावर त्यांचे यश अवलंबून असणार आहे. मोदींचा चेहरा आणि भाजपची साथ यावरही ही सर्व दारोमदार शेवाळेंचा असणार आहे.
मतदार संघाचा इतिहास काय?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी इथून विजय मिळवला होता. इथे एकूण 7 लाख 97 हजार 250 मतदारांनी मतांचा हक्क बजावला होता. त्यात शेवाळे यांना 4 लाख 24 हजार 913 मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड 2 लाख 72 हजार 774 मतं मिळाली होती. इथे शेवाळे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला होता. त्या आधी 2004 आणि 2009 साली काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेच्या मनोहर जोशी यांना त्यावेळच्या मध्य मुंबई मतदार संघातून गायकवाड यांनी पराभव केला होता. त्यावेळी जोशी हे लोकसभेचे अध्यक्ष होते. याच मतदार संघातून रामदार आठवले यांनीही प्रतिनिधीत्व केले आहे.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभेतील विधानसभा मतदार संघ
अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ
चेंबुर विधानसभा मतदारसंघ
धारावी विधानसभा मतदारसंघ
सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ
वडाळा विधानसभा मतदारसंघ
माहिम विधानसभा मतदारसंघ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world