- कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांच्या चिरंजीव कृष्णराज महाडिक महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार करीत आहेत
- कृष्णराज महाडिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी अर्ज सादर करून निवडणुकीत उतरू शकतात
- महाडिक कुटुंबाची तिसरी राजकीय पिढी कोल्हापुरात नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे
विशाल पुजारी
निवडणुका म्हटलं समोर येतात नेते आणि नेत्यांचे कार्यकर्ते. यंदाच्या निवडणुकीत नेत्यांची पोरं देखील मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल सुरु आहे. या निवडणुकीत कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव देखील इच्छुक उमेदवार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी महानगरपालिका निवडणुकही लढवण्याचा निर्धार केला आहे. नगरसेवक पदाची निवडणूक लढवून कोल्हापूरमध्ये महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात येत आहे हे स्पष्ट झालं आहे.
आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक राजकीय चर्चा जोरात आहे. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे महानगरपालिका निवडणुकीत एन्ट्री करतायत. त्यांच्या या एन्ट्रीनं विधानसभेनंतर महापालिका निवडणुकीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगलेल्या आहेत. कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिका लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधून रिंगणात उतरु शकतात. या उमेदवारीनंतर कोल्हापूरच्या राजकारणात महाडिकांची तिसरी पिढी पाहायला मिळेल.
कृष्णराज महाडिक हे प्रसिद्ध रीलस्टार, युट्युबर आणि कार रेसर आहेत. वडील खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे ते राजकारणात सक्रीय आहेत. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते. आता त्यांनी महापालिकेची निवडणूक लढायची आहे. कृष्णराज महाडिक यांना विधानसभेनंतर महापालिका निवडणुकीचे वेध लागलेलं दिसून येत आहे. अर्थात खासदार धनंजय महाडिक यासाठी प्रयत्न देखील करत आहेत. मात्र कोल्हापुरातील इतर राजकीय पक्षातून कृष्णाराज यांना अनेक सल्ले दिल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर फॉलोवर घेऊन रीलस्टार नेते होणं हे सोपं झालंय अशा प्रतिक्रिया आहेत.
विधानसभेत तिकीट मिळालं नाही म्हटल्यावर महानगरपालिका लढवण्याचा निर्धार कृष्णराज यांनी केलाय. एखादं पद मिळालं तर नक्की चांगल कामं करून दाखवेन असं विधान यापूर्वी कृष्णराज यांनी केला होता. त्यामुळं त्यांच्या निवडणुकीतील एंट्रीची चर्चा जोरात आहे. कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज घेतलाया खरा, मात्र त्यांचे वडील खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. विधानसभेत शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न झाले. मात्र तेव्हा संधी मिळाली नाही. आता महापालिकेची उमेदवारी पक्षाकडून मिळावी यासाठी निश्चितच त्यांचा पाठपुरावा सुरु असावा. जिल्ह्यातलं मोठं नेतृत्व जरी घरात असलं तरी निवडणुकीत मात्र जोर लावावा लागणार हेही तितकंच खरं आहे.