विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईत काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते पद भूषवलेले रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. त्यांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. जयश्री जाधव या काँग्रेसचा आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी आहेत. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर जयश्री जाधव यांनी पोटनिवडणुक लढत विजय मिळवला होता. मात्र आताच्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे नाराज झालेल्या जयश्री जाधव यांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून जयश्री यांना उमेदवारी हवी होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापूर उत्तर हा विधानसभा मतदार संध शिवसेनेकडे होता. शिवसेनेचे राजेश क्षिरसागर या मतदार संघातून सलग दोन वेळा विजयी झाले होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी क्षिरसागर यांचा पराभव केला. शिवसेनेचा मतदार संघ काँग्रेसकडे खेचून आणला. मात्र आमदार झाल्यानंतर चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. त्या जागेवर पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना रिंगणात उतरवलं. जयश्री जाधव या पती पेक्षा जास्त मतांनी विजयी होत आमदार झाल्या. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतूनही जयश्री जाधव यांनी आपल्या कोल्हापूर उत्तर मतदार संघातून शाहू महाराजांना मताधिक्य मिळवून दिले होते.
ट्रेंडिंग बातमी - माहीममध्ये नवा ट्विस्ट, बाळासाहेबांचं नाव घेऊन सदा सरवणकरांची राज ठाकरेंना साद
विधानसभेसाठी काँग्रेसकडून या मतदार संघातून राजेश लाटकर, जयश्री जाधव, मधुरिमाराजे हे इच्छुक होते. सुरुवातीला काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजीचा सुरू उमटला. काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला. त्यांच्या जागी माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांना उमेदवारी दिल्याने जयश्री जाधव या नाराज झाल्या. त्यांनी काँग्रेसकडे आपली नाराजी व्यक्त करत थेट पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.
जयश्री जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. जयश्री जाधव या मुळच्या शिवसैनिक आहेत. त्यांच्या प्रवेशाने पक्षाची ताकद वाढली असल्याचे यावेळी शिंदे म्हणाले. त्यांना महिलांसाठी काम करण्याची इच्छा आहे. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. महिलांना त्या नक्कीच न्याय देतील असेही शिंदे यावेळी म्हणाले. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करताना कोणतीही अपेक्षा व्यक्त केली नाही. त्या विद्यमान आमदार असतानाही त्यांनी उमेदवारीची अपेक्षा केली नाही असेही त्या यावेळी म्हणाल्या.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाने राजेश क्षिरसागर यांना उमेदवारी दिली आहे. क्षिरसागर यांना 2009 आणि 2014 अशा दोन्ही निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र 2019 ला त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून थोडे दुर गेले होते. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मात्र त्यांनी ठाकरें ऐवजी शिंदेना साथ दिली. ते पुन्हा राजकारणाच्या मुळ प्रवाहात सक्रीय झाले. आता त्यांनाच शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. दरम्यान जयश्री जाधव यांच्या शिवसेना प्रवेशामुळे काँग्रेसचे टेन्शन मात्र वाढले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. ही जागा राखण्यासाठी काँग्रेसला मोठे आव्हान आहे.