जाहिरात

माहीममध्ये नवा ट्विस्ट, बाळासाहेबांचं नाव घेऊन सदा सरवणकरांची राज ठाकरेंना साद

Sada Sarvankar on Raj Thackeray : मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाची लढत दिवसोंदिवस रंगतदार होत आहे.

माहीममध्ये नवा ट्विस्ट, बाळासाहेबांचं नाव घेऊन सदा सरवणकरांची राज ठाकरेंना साद
मुंबई:

मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाची लढत दिवसोंदिवस रंगतदार होत आहे. माहीममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवतायत. त्यांना महायुतीनं पाठिंबा द्यावा ही भाजपाची भूमिका आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी ती बोलून देखील दाखवलीय. पण, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी दिलीय. त्यामुळे अमित ठाकरेंपुढे तगडं आव्हान उभं आहे.

राज ठाकरेंना आवाहन

महायुतीमधून अंतर्गत विरोध होत असताना सदा सरवणकरांनी राज ठाकरेंना भावनिक साद घातली आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत राज ठाकरे यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं आहे. सरवणकरांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर ट्विट करत राज ठाकरेंना आवाहन केलंय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो. बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं.  त्यांचे पन्नास नातेवाईक दादर - माहिम मध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते.

एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली.राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या.' असं आवाहन सरवणकर यांनी केलंय.

सदा सरवणकरांनी मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला. आपल्याला अर्ज भरण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी मिळाल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं.

अमित ठाकरेंबाबत मुख्यमंत्र्यांच्या मनात काय? फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

( नक्की वाचा : अमित ठाकरेंबाबत मुख्यमंत्र्यांच्या मनात काय? फडणवीसांनी केला गौप्यस्फोट )