Latur News : हिंदुत्ववादी भाजपाचा लातूरमध्ये 'मुस्लीम पॅटर्न', चक्क 7 उमेदवारांना तिकीट; काय आहे कारण?

Latur Municipal Election 2026: लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वांना धक्का देत एक नवा राजकीय प्रयोग केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
लातूर:

विष्णू बुरगे, प्रतिनिधी

Latur Municipal Election 2026: लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वांना धक्का देत एक नवा राजकीय प्रयोग केला आहे. आतापर्यंत भाजपवर मुस्लीम विरोधी असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता, मात्र लातूर भाजपने यंदा चक्क सात मुस्लिम उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून नवा पॅटर्न समोर आणला आहे. लातूरचे शैक्षणिक पॅटर्न जसे राज्यभर प्रसिद्ध आहे, तसेच आता या राजकीय पॅटर्नची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगू लागली आहे.

लातूर भाजपाचा नवा मुस्लिम पॅटर्न

लातूर महानगरपालिकेच्या एकूण 70 जागांपैकी भाजप 70 जागा लढवत आहे. विशेष म्हणजे यातील 7 जागांवर भाजपने मुस्लिम चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपच्या इतिहासात लातूरमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

यामध्ये कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या मुलाचाही समावेश आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून अनेकदा चर्चा होत असली, तरी भाजपने पाशा पटेल यांच्या मुलाला संधी देऊन या समाजातील आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला आहे.

( नक्की वाचा : Latur News : 'विलासरावांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील,' भाजपा प्रदेशाध्यक्षांचं काँग्रेसला थेट चॅलेंज )

मुस्लिमांची मोठी संख्या असलेल्या प्रभागांवर लक्ष

लातूर शहर हे मुस्लिम बहुल शहरांपैकी एक मानले जाते. प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 1 ते 5 हा जो भाग 'गाव भाग' म्हणून ओळखला जातो, तिथे मुस्लिम समुदायाची लोकसंख्या मोठी आहे. याच भागात एमआयएमचाही प्रभाव पाहायला मिळतो. 

Advertisement

त्याचवेळी काँग्रेसच्या 'फोडा आणि राज्य करा' या नीतीला उत्तर देण्यासाठी भाजपने यावेळी मुस्लिम कार्ड खेळले आहे. या प्रभागांमधून आपला प्रतिनिधी निवडून यावा आणि मुस्लिमांनाही सत्तेत वाटा मिळावा, या उद्देशाने भाजपने हे सात उमेदवार रिंगणात उतरवल्याचे बोलले जात आहे.

( नक्की वाचा : Latur News : लातूरमध्ये 'पोस्टर' धडाका; निलंगेकरांना 'रहमान डकैत'ची उपमा, निवडणुकीआधीच राडा )
 

भाजपानं काय दिलं कारण?

भाजप नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी पक्षाच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे. भारतीय जनता पार्टी 'सबका साथ, सबका विकास' हे ब्रीदवाक्य घेऊन काम करते आणि म्हणूनच लातूरमध्ये मुस्लिम समुदायाचे 7 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

भाजपकडे आता मुस्लिम समाजाचा ओढा वाढत असून, काँग्रेसने केवळ मतांसाठी मुस्लिमांचा वापर केला असा आरोपही यावेळी करण्यात आला. भाजपच्या या नव्या डावपेचांमुळे लातूरच्या निवडणुकीत चुरस वाढली असून, मतदार कोणाला साथ देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.