विष्णू बुरगे, प्रतिनिधी
Latur Municipal Election 2026: लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अधिकच तापू लागला आहे. प्रचाराच्या धामधुमीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
'विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील', असे वक्तव्य चव्हाण यांनी केल्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष आता टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती
लातूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याच प्रचाराचा भाग म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोमवारी, 5 जानेवारी 2026 रोजी लातूर दौऱ्यावर होते. शहरातील साळाई मंगल कार्यालयात आयोजित बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यापूर्वी पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूरचा दौरा केला होता, त्यानंतर आता स्वतः प्रदेशाध्यक्षांनी मैदानात उतरून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला.
( नक्की वाचा : Latur News : लातूरमध्ये 'पोस्टर' धडाका; निलंगेकरांना 'रहमान डकैत'ची उपमा, निवडणुकीआधीच राडा )
विलासरावांबद्दलचे ते वादग्रस्त वक्तव्य
रवींद्र चव्हाण भाषणासाठी उभे राहिल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या उत्साहाच्या वातावरणात बोलताना चव्हाण यांनी थेट विलासराव देशमुख यांचा उल्लेख करत खळबळजनक विधान केले.विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, असे ते म्हणाले.
विलासराव देशमुख आणि लातूर हे समीकरण गेल्या अनेक दशकांपासून घट्ट आहे. लातूर जिल्ह्याची निर्मिती आणि शहराचा विकास यात विलासरावांचे योगदान मोठे असल्याची अनेक लातूरकरांची भावना आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या आठवणी पुसून टाकण्याबाबत केलेल्या विधानामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत.
( नक्की वाचा : Dombivli News: 'पैसे घेऊन पळकुट्या लोकांना उमेदवारी दिली', ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखावर उमेदवाराचाच खळबळजनक आरोप )
काँग्रेसचा बालेकिल्ला आणि आगामी लढत
लातूर हा पारंपरिकपणे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचे पुत्र आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी ही धुरा सांभाळली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते नेहमीच विलासरावांनी केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतात. आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी थेट विलासरावांच्या वारशावरच भाष्य केल्यामुळे काँग्रेस आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.
या वक्तव्यानंतर आमदार अमित देशमुख आणि काँग्रेसचे इतर नेते काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. चव्हाण यांच्या निवडणुकीच्या वातावरणात भाजपला फायदा होतो की काँग्रेसला सहानुभूती मिळते, हे 16 जानेवारी रोजी निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world