Latur News : विलासरावांच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा भाजपाला 'घरचा आहेर'; लातूरच्या सभेत नेमकं काय घडलं?

Latur Municipal Election 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूरमधील प्रचारसभेत भाजपावर निशाणा साधला.

जाहिरात
Read Time: 3 mins
Latur News : अजित पवारांनी लातूरच्या सभेत आश्वासनांचा पाऊस पाडला.
लातूर:

त्रिशरण मोहगावकर, प्रतिनिधी

Latur Municipal Election 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात दिवंगत विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्रासाठीचे योगदान खूप मोठे आहे आणि ते कधीही विसरता येणार नाही, अशा शब्दांत त्यांनी विलासरावांबद्दलचा आदर व्यक्त केला.

लातूरमध्ये येऊन इथल्या दिवंगत नेत्यांबद्दल चुकीचे बोलणे महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा देत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. हयात नसलेल्या नेत्यांबद्दल आदरानेच बोलले पाहिजे, अशी समजही त्यांनी यावेळी राजकीय नेत्यांना दिली.

विलासरावांच्या योगदानाची दखल आणि भाजपला इशारा

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असे विधान केले होते, ज्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी, अजित पवारांनी पुन्हा एकदा हा विषय उचलून धरत भाजपला डिवचले आहे. जाती-जातीत तेढ निर्माण होईल असे वागणे कोणालाही शोभत नाही, असेही ते म्हणाले.

( नक्की वाचा : Latur News : 'विलासरावांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील,' भाजपा प्रदेशाध्यक्षांचं काँग्रेसला थेट चॅलेंज )
 

'निधीची कमतरता पडू देणार नाही'

राज्याचा अर्थमंत्री म्हणून लातूरच्या विकासासाठी आपण कधीही निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. लातूरच्या क्रीडा संकुलासाठी 75 कोटी रुपये आणि सहकार भवनसाठी 25 कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती त्यांनी दिली. 

Advertisement

ज्याप्रमाणे इचलकरंजीच्या विकासात आपण लक्ष घातले आहे, अगदी त्याचप्रमाणे लातूरच्या विकासासाठीही आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर आणि नांदेड सारख्या शहरांनी विकासाच्या बाबतीत पुढे गेले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

( नक्की वाचा : Latur News : हिंदुत्ववादी भाजपाचा लातूरमध्ये 'मुस्लीम पॅटर्न', चक्क 7 उमेदवारांना तिकीट; काय आहे कारण? )

'पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर लातूरचा विकास करणार'

लातूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराच्या धर्तीवर विकास आराखडा राबवण्याचा संकल्प अजित पवारांनी बोलून दाखवला. शहराच्या स्वच्छतेपासून ते सुशोभीकरणापर्यंत त्यांची बारीक नजर असल्याचे त्यांनी सांगितले. लातूरमधील डिव्हायडरमध्ये सुकलेली झाडे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि शहराच्या सौंदर्यीकरणावर भर देण्याचे आश्वासन दिले. औसा शहरात जर स्पर्धा परीक्षा केंद्र उभे राहू शकते, तर लातूरमध्ये का नाही? असा सवाल त्यांनी केला.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वधर्मसमभाव जपणारा पक्ष असल्याचे सांगत अजित पवारांनी यंदाच्या निवडणुकीत दिलेल्या उमेदवारांची माहिती दिली. 61 पैकी 15 मुस्लिम, 15 मागासवर्गीय, 15 ओबीसी आणि 6 इतर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये लंडनमधून शिक्षण घेऊन आलेल्या उच्चशिक्षित तरुणीलाही संधी देण्यात आली आहे. भाजी मंडईत महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावणे, अल्पसंख्याकांसाठी विशेष बजेटची तरतूद करणे आणि कबाल्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लावणे अशा अनेक आश्वासनांचा त्यांनी पाऊस पाडला.