आज देशभरात दुसऱ्या टप्प्याच मतदान पार पडत आहे. निवडणुका म्हटलं की, उमेदवार विविध प्रकारची प्रलोभनं घेऊन मतदारांपर्यंत येत असतात. मात्र केवळ मतदानावेळी दिसणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात मतदारांनी बहिष्काराचं शस्त्र उगारलं आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील पाच गावांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. रंगुबेली, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा, खोपमार या गावातील नागरिकांनी हा बहिष्कार घातला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे पूर्ण झाली असताना आम्हाला कोणत्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप करत अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील पाच गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. यामध्ये रंगबेली, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा, आणि खोपमार या गावांचा समावेश आहे.
गेल्या 77 वर्षांपासून आम्ही मुलभुत सुविधांपासून वंचित असून आम्ही निवडून दिलेले एकही प्रतिनिधी आमच्या समस्यांच्या निराकरण करण्यास तत्पर दिसत नाही. पिण्याचे पाणी, विद्युत, पक्के रस्ते यांसारख्या एकही सुविधा आम्हाला मिळाल्या नसून प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे आम्ही मागणी केली असता आमच्या समस्यावर तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत आमच्या समस्या निकाली निघत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
नक्की वाचा- आधी लगीन लोकशाहीचं! मंडपात जाण्यापूर्वी नवरा, नवरदेव मतदान केंद्रावर
दुसरीकडे मतदानावर बहिष्काराचे शस्त्र उगारून गावकऱ्यांनी प्रशासनाला आपल्या मागणीवर कारवाई करण्यास भाग पाडल्याचे आज दिसून आले. 2008 या वर्षी परभणीतील बलसा खुर्द या गावाचे पुनर्वसन खानापूर शिवारात झाले तेव्हापासून गावकऱ्यांना गावगुंडांचा आणि त्यांनी केलेल्या अतिक्रमणाचा त्रास होत होता.
मात्र तक्रार केल्यानंतरही प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यावर ठोस कारवाई करीत नव्हते. त्यामुळे अखेर गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्काराचं शस्त्र उगारलं. आज सकाळपासून तिथे मतदान केंद्रांवर कोणी मतदानाला गेले नाही. त्यामुळे प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्वतः येऊन गावकऱ्यांची भेट घेतली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांना तत्काळ कारवाईचे आश्वासन दिले. त्यांची शिष्टाई यशस्वी झाली आणि गावकऱ्यांनी देखील आपला हट्ट सोडून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यास तयार झाले.
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावाला मागील 22 वर्षांपासून ग्रामपंचायतीचा दर्जा मिळालेला नाही. या गावाला ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा तसेच आम्हाला आमचा अधिकार द्यावा, याकरिता पांगरी महादेव ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या गावात एकूण 487 मतदार असून आतापर्यंत एकही मतदान करण्यात आलं नाही. जोपर्यंत आमच्या गावाला ग्रामपंचायतीचा दर्जा मिळून ग्रामपंचायत स्थापन होत नाही. तोपर्यंत सर्व निवडणुकांवर आमचा बहिष्कार कायम राहणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे.