मुंबईतील उत्तर मध्य लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. उत्तर मध्य मुंबईची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली असून पक्षाने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघावर आधीपासून काँग्रेसचा दावा होता. २०१९ च्या निवडणुकीत प्रिया दत्त यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा २०१४ आणि २०१९ असा सलग दुसऱ्यांदा भाजपच्या पूनम महाजन यांनी पराभव केला. पूनम महाजन यांची विजयाची हॅटट्रिक करण्याची इच्छा आहे.
(नक्की वाचा - शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा जाहीर; राज्यातील जनतेसाठी काय आहेत आश्वासने?)
महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला असला तरी महायुतीने मात्र अजूनही सावध भूमिका घेतली आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. मात्र पूनम महाजन यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे.
(नक्की वाचा : उंटावरुन शेळ्या, वाघाचं कातडं ते रिंगमास्टर; डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांची ठाकरेंविरोधात टोलेबाजी )
आशिष शेलार यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढावी यासाठी पक्ष आग्रही असल्याची माहिती देखील समोर येत आहे. याशिवाय काही सेलिब्रिटींच्या नावाचाही विचार सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्या समोर महायुतीकडून कोण उमेदवार असेल याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.