लोकसभा निवडणूक 2024 आता अंतिम टप्प्यात आहे. मतदानाचे सातही टप्पे पार पडले असून मंगळवारी 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारांचं भवितव्य ज्या ईव्हीएममध्ये बंद झालं आहे ते सर्व स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीच्या दिवशी हे सर्व ईव्हीएस ओपन करुन निकाल स्पष्ट होतील. मात्र अनेकांना प्रश्न आहे की मतमोजणी नेमकी होते कशी? याबाबत सविस्तर माहिती घेऊया.
मतमोजणीच्या दिवशी सकाळी 7 वाजता सर्व पक्षाचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत स्ट्राँग रुमचं कुलूप उघडलं जातं. यावेळी निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाचे विशेष निरीक्षक तेथे उपस्थित असतात. सर्व प्रक्रियेचा व्हिडीओ देखील शूट केला जातो.
मतमोजणी कशी होते?
मतमोजणीसाठी ईव्हीएमचे कंट्रोल युनिट काऊटिंग टेबलवर आणले जातात. ही सर्व प्रक्रिया सीसीटीव्ही आणि कॅमेऱ्यात शूट केली जाते. टेबलवर प्रत्येक कंट्रोल युनिटचा युनिक आयडी आणि सील मॅच केले जातात. त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराच्या पोलिंग एजंटला देखील ते दाखवले जाते. त्यानंतर कंट्रोल युनिटमधील एक बटन दाबल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला पडलेली मते ईव्हीएममध्ये त्याच्या नावासमोर दिसू लागतात.
मतमोजणी कुणाकडून केली जाते?
प्रत्येक मतमोजणी केंद्रात एका हॉलमध्ये 15 टेबल असतात. यातील 14 टेबल मतमोजणीसाठी आणि एक टेबल निवडणूक अधिकाऱ्यासाठी असतो. कोणता कर्मचारी कोणत्या टेबलवर मोजणी करणार हे गुपीत ठेवलं जातं. ज्यादिवशी मतमोजणी असते त्या दिवशी सकाळी जिल्हा निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना हॉल आणि टेबलची वाटणी करतात.
मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरु होते. सर्वात आधी पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेटची मोजणी होते. त्यानंतर लगेचच ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरु होते. जवळपास तासाभरानंतर कल सुरु होता.
मतमोजणी कक्षात कुणाला जाण्याची परवानगी असते?
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मतमोजणी कक्षात प्रत्येक हॉलच्या प्रत्येक टेबलवर उमेदवाराकडून एका प्रतिनिधीला जाण्याचा परवानगी असते. एका हॉलमध्ये 15 पेक्षा जास्त प्रतिनिधी जाऊ शकत नाहीत. प्रत्येक उमेदवार आपल्या प्रतिनिधीची निवड करतात. निवडणूक अधिकाऱ्यांना आपल्या प्रतिनिधीचं नाव, फोटो आणि आधार कार्ड देतात.
याशिवाय मतदान केंद्रात मतमोजणी कर्मचारी, निवडणूक अधिकारी, सुरक्षा कर्मचारी यांना जाण्याची परवानगी असते. जोपर्यंत मतमोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणालाही बाहेर जाण्याची परवानगी नसते. निकालाच्या अधिकृत घोषणेनंतर जर एखाद्या प्रतिनिधीला मजमोजणीबाबत संशय असल्यास तो पुन्हा मतमोजणीची मागणी करु शकतो.
निवडणूक अधिकारी प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतांचा डेटा गोळा करुन निकाल जाहीर करतात. जो उमेदवार जिंकतो त्याला विजयाचं प्रमाणपत्र दिलं जातं.
मतमोजणीनंतर ईव्हीएमचं काय होतं?
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम पुन्हा स्ट्राँग रुममध्ये ठेवले जातात. नियमानुसार, मतमोजणीनंतर 45 दिवस ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये ठेवले जातात. कारण कोणताही उमेदवार पुन्हा मतमोजणीची मागणी करु शकतो. त्यामुळे एखाद्या उमेदवाराने तशी मागणी केली तर मतांचा मोजणी पुन्हा केला जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम दुसऱ्या ठिकाणी पाठवले जातात.
नक्की वाचा:
माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहरावांच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण उधळणार विजयाचा गुलाल?
लोकसभा एग्झिट पोलनंतर शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स 2 हजार तर निफ्टीचा नवा विक्रम
Lok Sabha Result : पंतप्रधान मोदी की राहुल गांधी, देशाची गॅरेंटी कुणाला? उद्या होणार फैसला