जाहिरात

माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहरावांच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण उधळणार विजयाचा गुलाल?

गजभियेंना वंचितनेही पाठिंबा जाहीर केल्यानं रामटेक लोकसभा मतदारसंघात आता नेमकं होणार तरी काय, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.   

माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहरावांच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण उधळणार विजयाचा गुलाल?
रामटेक:

शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि काँग्रेसचे माजी आमदार राजू पारवे विरुद्ध काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे अशी रामटेक लोकसभा मतदारसंघातील लढत आहे. रश्मी बर्वे यांना पहिल्यांदा काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. मात्र जातपडताळणी समितीनं रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्रच रद्द केल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यातच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या किशोर गजभिये यांनी बंडखोरी केली. गजभियेंना वंचितनेही पाठिंबा जाहीर केल्यानं रामटेक लोकसभा मतदारसंघात आता नेमकं होणार तरी काय, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.   

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेले. 2024 च्या लोकसभा निवडणुकांत पुन्हा तुमाने यांनाच तिकीट मिळेल असं सांगण्यात येत होतं. मात्र भाजपनं राज्यभरात केलेल्या सर्वेक्षणानंतर तुमाने यांच्या नाववर फुली मारण्यात आली. त्यांच्याऐवजी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश देत त्यांना या मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं विदर्भातील रामटेकची हक्काची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपांच्या चर्चेत काँग्रेसला सोडली.  

राजू पारवेंची ताकद किती 
रामटेक लोकसभा मतदारसंघावर 2024च्या निवडणुकीसाठी भाजपाने पहिल्यांदा दावा केला होता. अखेरच्या क्षणापर्यंत हा मतदारसंघ भाजपाच्या पारड्यात पडावा यासाठी प्रयत्न सुरु होते. कृपाल तुमानेंविरोधात एन्टी इक्मबन्सीचं कारण यासाठी पुढं करण्यात आलं होतं. राजू पारवेंना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना तिकीट देण्याची रणनीती होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी अखेरच्या क्षणापर्यंत या मतदारसंघावरचा दावा सोडला नाही. कृपाल तुमानेंना तुल्यबळ पर्यायी उमेदवारी देण्यासाठी राजू पारवेंचा प्रवेश शिंदेंच्या शिवसेनेत करण्यात आला आणि त्यांना तिकीट देण्यात आलं. 

Latest and Breaking News on NDTV

राजू पारवे हे उमरेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांच्या आग्रहामुळं राजू पारवे हे काँग्रेसमध्ये आले. 2014 साली त्यांनी त्यांचे बंधू भाजपाचे सुधीर पारवे यांच्याविरोधात अपक्ष निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. मुळक यांच्या पाठिंब्यानं 2019 साली काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यानं पारवे आमदार झाले. त्यानंतर मुळक विरुद्ध पारवे असा वाद सुरु झाला. यातून पारवेंना भाजपानं हेरल्याचं मानण्यात येतंय. 

Latest and Breaking News on NDTV

तरुण नेतृत्व अशी पारवे यांची ओळख असली तरी रामटेक लोकसभा मतदारसंघात त्यांचं किती अपील असेल, हे आता निकालानंतर दिसणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार तुमाने हेही नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचाही फटका पारवेंना बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस सोडून आल्यानं स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते आणि जनता काय निर्णय घेणार हेही पाहावं लागणार आहे. 

Latest and Breaking News on NDTV

बर्वेंची ताकद किती? 
श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे कट्टर समर्थक आहेत. ग्राम पंचायत ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत. नागपूर जिल्हा परिषद, पदवीधर निवडणुकीत केदार यांची ताकद दिसली होती. केदार यांना नुकतीच झालेल्या अटक आणि जामिनानंतर केदार चुरशीनं या मतदारसंघासाठी मैदानात उतरल्याचं मानण्यात येतंय. या जागेसाठी काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत आणि सुनील केदार यांच्यात रस्सीखेच होती. नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांना तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी केदारांच्या बाजूनं कौल दिला आणि रश्मी बर्वेंना उमेदवारी दिली होती. नितीन राऊत यांची नाराजी, किशोर गजभियेंचं बंड याचा किती फटका काँग्रेसला बसणार हेही पाहावं लागणार आहे.          

Latest and Breaking News on NDTV

काय होते प्रचाराचे मुद्दे 
रामटेक लोकसभा मतदारसंघात हिंगणा, उमरेड, कामठी आणि रामटेक या चार विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद आहे. तर काटोलमधून शरद पवार राष्ट्रवादीचे अनिल देशमुख तर सावनेरमधून काँग्रेसचे नेते सुनील केदार हे आमदार आहेत. त्यामुळं चुरशीची निवडणूक झालीय. 

हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. 16 ते 18 टक्के मतदान हे अनुसूचित जातींचे आहेत. भाजप आणि काँग्रेसनं दलित उमेदवार दिले आहेत. त्यामुळं बौद्ध समाजात नाराजीचा सूर होता. याचा फायदा वंचितच्या गजभियेंना होण्याची शक्यता आहे. रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानंतर महिलेवरील अन्यायाचा मुद्दाही प्रचारात गाजल्याचं सांगण्यात येतंय. रामटेकमध्ये नरेंद्र मोदींची झालेल्या सभेनंही मोठा फरक पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. स्थानिक मुद्द्यांसह राष्ट्रीय मुद्दे महत्त्वाचे ठरण्याचीही शक्यता आहे.   

या निवडणुकीत 61 टक्के मतदान झालेलं आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा याचं प्रमाण 1 ते 1.5 टक्क्यांनी घटलंय. आता याचा फायदा कुणाला होणार, हे पाहावं लागणार आहे. महायुतीच्या ताब्यात असलेल्या रामटेक या भाजपच्या बालेकिल्ल्यात 66 टक्के मतदान झालं आहे.  हिंगण्यात 54 टक्के, कामठीत 58 टक्के तर पारवेंच्या उमरेड मतदारसंघात 67 टक्के मतदान झालेलं आहे. अनिल देशमुखांच्या काटोलमध्ये 62 टक्के तर केदारांच्या सावनेरमधून 61 टक्के मतदान झालं आहे.    

नक्की वाचा - अद्यापही आदिवासी दुर्लक्षित जिल्हा, गडचिरोलीत होणार का 'तख्ता पलट'?

काय आहे रामटेक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास 
विदर्भातील नागपूरपाठोपाठ महत्त्वाचा मतदारसंघ अशी रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख. आधी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या लोकसभा मतदारसंघाची ओळख होती. 1957 पासून काँग्रेसला बालेकिल्ला अशी रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख राहिली. देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव हे 1984 आणि 1989 च्या लोकसभा निवडणुकीत दोन वेळा रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर ते देशाचे पंतप्रधानही राहिले. पी व्ही नरसिंहराव यांच्यासोबतच भोसले घराण्याच्या राणी चित्रलेखा, दत्ता मेघे, मुकुल वासनिक या काँग्रेसच्या नेत्यांनी रामटेकमधून खासदारकी भूषवली. 1998 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं. 1999 च्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी सुबोध मोहितेंना संधी दिली, त्यानंतर रामटेक आणि शिवसेना असं समीकरणचं निर्माण झालं. 2009 साली मुकुल वासनिक यांनी काँग्रेसला हा मतदारसंघ पुन्हा मिळवून दिला. मात्र 2014 पासून कृपाल तुमाने यांनी सलग दोन वेळा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर रामटेकमधून खासदारकीचा मान मिळवला.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com