उद्धव ठाकरेंचा आदेश धुडकावला, रायगडमधील 2 उमेदवारांचा माघार घेण्यास नकार

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी आदेश देऊनही रायगड जिल्ह्यातील दोन उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज (सोमवार, 4 नोव्हेंबर) संपली आहे. राज्यात यंदा भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी यांची महायुती तर काँग्रेस-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) यांची महाविकास आघाडी पक्षात मुख्य लढत आहे. दोन्ही आघाड्यांमधील पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे सर्वच पक्षांना बंडखोरीचा फटका बसला. बंडखोरांना मनवण्याचे शर्थीचे प्रयत्न करुनही काही जणांची बंडखोरी कायम आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाला रायगड जिल्ह्यामध्ये बंडखोरीचा फटका बसला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

उद्धव ठाकरे यांनी आदेश देऊनही पेण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतली नाही. पेणमधून प्रसाद भोईर तर पनवेलमधून लीना गरड यांना ठाकरे यांच्या पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी पक्षातील जागावाटपानुसार या जागा शेतकरी कामगार पक्षाला देण्यात येत असल्याने त्यांना माघार घेण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले होते. पण, त्यानंतरही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून मात्र ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी माघार घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून सुरेंद्र म्हात्रे यांना माघार घेण्याचे आदेश दिले होते. 

उरणमध्ये तिरंगी लढत

उरण मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारानं माघार घेतलेली नाही. उरण विधानसभेत शेतकरी कामगार पक्षाकडून प्रीतम म्हात्रे ठाकरे गटाकडून मनोहर भोईर आणि भाजपकडून महेश बालदी यांची तिरंगी लढत होणार आहे. पेण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच उरणमध्येही महाविकास आघाडीमधील दोन पक्षांचे उमेदवार कायम होते. 

2 मिनिट उशीर झाला आणि अर्ज कायम राहिला, सोलापूरच्या घटनेची राज्यात चर्चा

Advertisement

( नक्की वाचा : 2 मिनिट उशीर झाला आणि अर्ज कायम राहिला, सोलापूरच्या घटनेची राज्यात चर्चा )

दिंडोशी मधील ठाकरे गटातील बंडखोरी कायम 

मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते रुपेश कदम यांनी अर्ज मागे घेतला नाही. दिंडोशीमधून ठाकरे गटाकडून सुनील प्रभू हे उमेदवार आहेत. महायुतीकडून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून संजय निरुपम, आणि मनसेकडून भास्कर परब या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.