शरद सातपुते, सांगली
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता काही दिवसच उरले आहेत. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी 23 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 21 तारखेला (सोमवारी) मतदानाच्या तोफा थंडावतील. त्यामुळे सर्वच मतदारसंघात प्रचाराला वेग आलाय. राज्यातील प्रमुख नेते आपआपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार करत आहेत. सांगली जिल्ह्यातल्या मिरज मतदारसंघात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (14 नोव्हेंबर) सभा घेतली. या सभेत पंकजा यांनी भर सभेत नवस केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपाच्या बालेकिल्ल्यात सभा
पश्चिम महाराष्ट्रातील मिरज मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. कामगार मंत्री सुरेश खाडे भाजपाचे आमदार आहेत. खाडे 2004 साली सर्वप्रथम जतमधून निवडून आले. 2009 साठी मिरज मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर खाडे मिरजेतून सलग तीनदा निवडून आले आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय अशीही खाडेंची ओळख होती. त्यांच्या प्रचारासाठी पंकजा यांनी सभा घेतली.
कोणता नवस केला?
पंकजा यांनी या भाषणात खाडे यांच्या कार्याची जोरदार प्रशंसा केली. खाडे यांनी पाण्याची सोय केली. म्हैसाळचे पाणी अजून सुरु आहे. त्यामुळे या भागातील दुष्काळ टळला. सुरेश खाडे यांची पाचवी टर्म आहे,अजून काय पाहिजे? हे परमनंट आमदार असल्याचं प्रशस्तीपत्रक त्यांनी दिलं.
गोपीनाथ मुंडे साहेबांनी येथील गावच्या मंदिरात नवस केल्याची गोष्ट मला सांगितली होती. तो नवस पूर्ण झाला. आता मी काय नवस करु? असा प्रश्न पंकजा यांनी विचारला. त्यावर 'मुख्यमंत्री होऊ दे', असा नवस करा, अशी मागणी गर्दीतून झाली. त्यावर राज्यात महायुतीचं सरकार येऊ दे, असा नवस करते, असं पंकजा यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : PM Modi on Reservation : 'सर्वांनी एक राहा, अन्यथा काँग्रेस आरक्षण समाप्त करेल, मोदींचा गंभीर इशारा )
तुम्ही खाडे साहेबांना ब्लॅकमेल करता...
माझं वय लहान आहे, पण तरी मला खूप मान मिळत आहे. खाडे साहेब इथं निवडून येणार आहेत. तरी देखील मला का बोलावलं? असा प्रश्न पंकजा यांनी सभेत विचारला आणि स्वत:च गंमतीशीर उत्तर दिलं. तुम्हाला ताईला बघायचं आहे. ताई यावेळी प्रचााला यायला हवी म्हणून तुम्ही खाडे साहेबांना ब्लॅकमेल करता, असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं.
शिवशक्तीपीठ यात्रेदरम्यान माझं इथं भव्य स्वागत झालं. अंगावर एवढी फुले मारली की अंगावर नीळ उठले होते, फुले मारून अंगावर काळे-निळे व्रण पडले होते. राजकारणमध्ये इतकं प्रेम मिळणं सोपं नाही. सासुरवाडीत खूप प्रेम मिळालं, हे धनूभाऊंना सांगणार आहे, असं पंकजा यावेळी म्हणाल्या.